पंधरा दिवसांना पाणी
परभणी : शहरातील नळ योजनेद्वारे पाणीपुरवठ्याचा कालावधी वाढला असून, नागरिकांना पंधरा दिवसांतून एक वेळा पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याची साठवण करुन ठेवावी लागत आहे. शहरात नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाली आहे. मात्र नियोजन झाले नसल्याने शहरवासियांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. किमान चार दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करावा, अशी शहरवासियांची मागणी आहे.
महामंडळाचे वाढले उत्पन्न
परभणी : येथील एसटी. बससेवा आता पूर्ववत झाली आहे. लांबपल्ल्याच्या बसेससह जिल्ह्यांतर्गत बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. शिवाय फिजिकल डिस्टन्स न पाळता पूर्ण क्षमतेने बसमधून प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने त्याचाही परिणाम उत्पन्न वाढीवर झाला आहे.
प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
परभणी : एसटी. महामंडळाने शहरात उभारलेल्या प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. जिंतूर रोडवरील प्रवासी निवारा सध्या वापरात आहे. मात्र वसमत रस्त्यावरील प्रवासी निवाऱ्याच्या ठिकाणी सुविधा नसल्याने गैरसोय होत आहे. राजगोपालाचारी उद्यान, शिवशक्ती बिल्डींग आणि सावली विश्रामगृहासमोरील प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
दीपोत्सवास प्रतिसाद
परभणी : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शहरात विविध भागात मंदिरांमध्ये दीपोत्सव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने अनेक दिवसांनंतर मंदिरांमध्ये पूजा, आरती आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. दीपोत्सवानंतर भाविवकांनी मनोभावे दर्शन घेतले.
वाहतकू बनली धोकादायक
परभणी : येथील महात्मा जाेतिबा फुले यांच्या पुतळ्या परिसरात चौकाची आखणी केली नसल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. शाही मशिद, नारायण चाळ, प्रशासकीय इमारत आणि स्टेडियम कॉम्प्लेक्स या चारही भागातून येणारी वाहने याच रस्त्याने धावतात. मात्र चौक नसल्याने पुतळा परिसरात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी चौकाची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.