परभणी- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परभणीपोलिसांनी आॅलआऊट आॅपरेशन सुरू केले असून, या अंतर्गत परभणी शहरातून हद्दपार केलेल्या एका आरोपीच्या घरात एक पिस्तूल, दोन जीवंत काडतूस आणि एक तलवार पोलिसांनी जप्त केली आहे़ रविवारी मध्यरात्री १२़३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़
पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय आणि अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशोत्सव, मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जिल्ह्यात १६ व १७ सप्टेंबर रोजी आॅलआऊट आॅपरेशन राबविण्यात आले़ १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता मोहिमेला सुरुवात झाली़ या अंतर्गत परभणी शहरातील गुन्हेगार, गुन्हेगारी वस्ती, फरारी आरोपी, प्रतिबंधित कारवाई केलेले आरोपी तडीपार केलेले आरोपी अशा ३७ आरोपींची तपासणी करणयत आली़ रात्री ११़४० वाजेच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हद्दपार केलेला आरोपी बिबनसिंग बावरी (रा़ न्यू़ नेहरू नगर, जुना पेडगाव रोड, परभणी) हा परभणी येथे आला असून, त्याच्या जवळ पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ त्या आधारे बिबनसिंग बावरी याच्या राहत्या घरी रात्री १२़३० वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला़ घराची झडती घेतली असता, पलंगावरील गादीखाली अग्नीशस्त्र गावठी पिस्तूल, दोन जीवंत काडतूस व धारदार तलवार मिळून आली़
या प्रकरणी उपनिरीक्षक सुनील गोपीनवार यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ आरोपीने ही शस्त्रे कोठून आणली व त्याचा कशासाठी वापर केला जाणार होता? याचा तपास पोलीस करीत आहेत़ ही कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक तृप्ती जाधव, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक निरीक्षक बी़पी़ चोरमले, उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, कापुरे, विवेक सोनवणे, डोंगरे, बालासाहेब तुपसुंदरे, चट्टे, भोसले, कुरवारे, हिंगोले आदींनी केली़