शासकीय कार्यालयात वाढली अस्वच्छता
परभणी : जिल्हाभरात स्वच्छता अभियान राबविणाऱ्या शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छता वाढली आहे. येथील प्रशासकीय इमारत परिसरात ही परिस्थिती दिसून येते. या भागात अनेक शासकीय कार्यालयांचे कामकाज चालते. मात्र, इमारत परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. फरश्या उखडल्या असून, भिंतींचे कोपरे पान खाऊन थुंकल्याने रंगले आहेत.
पाण्याअभावी झाडे वाळू लागली
परभणी : शहरातील जिंतूर रस्ता आणि वसमत रस्त्याच्या दुभाजकावरील झाडे वाळू लागली आहेत. जिल्ह्यात आता उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. त्यामुळे दुभाजकावरील झाडांना पाणी देण्याची नितांत आवश्यकता आहे. मनपा प्रशासनाने दुभाजकावर लावलेल्या झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
जड वाहनांचा शिरकाव
परभणी : शहरात सर्रास जड वाहनांचा शिरकाव होत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. नियम डावलत ही वाहने शहरातून धावतात. त्यामुळे वाहतूक खोळंबा होत आहे. बाजारपेठ भागात ही समस्या अधिक आहे.
बसस्थानकात अस्वच्छता
परभणी : येथील बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली आहे. नालीचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतेही उपाय केले नाहीत. त्यामुळे घाण पाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे.
चौक बनला धोकादायक
परभणी : येथील स्टेडियम परिसरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ चारही बाजूने येणाऱ्या रस्त्यावर चौकाची निर्मिती न केल्याने हा परिसर वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. चारही बाजूने एकाच वेळी वाहने या चौकात येतात.
वाहनतळांवर अतिक्रमण
परभणी : शहरात वाहनतळासाठी निश्चित केले्ल्या जागांवर अतिक्रमण झाले असून, वाहने उभी करण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने रस्त्याच्या कडेनेच वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.
प्लास्टीकमुक्तीला अल्प प्रतिसाद
परभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागात प्लास्टीकमुक्त गाव चळवळ राबविली जात आहे. स्वच्छता अभियानाबरोबरच प्लास्टीक मुक्त गावाचे जनजागरण केले जात असून, ठिकठिकाण प्लास्टीक कचरा संकलित केला जात आहे. प्लास्टीकच्या वापरामुळे पर्यावरणास धोका निर्माण होतो.