सोनपेठ येथील पंचायत समिती कार्यालयास बुधवारी सीईओ टाकसाळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, गटविकास अधिकारी सचिन खुडे आदींची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कृषी विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन विहीर योजना मग्रारोहयो अंतर्गत वैयक्तीत लाभाच्या विहिरी आदींची कामे तसेच सार्वजनिक विहिरींची कामे तातडीने पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले. लाल कंधारी, देशी गायींच्या वाणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीकोणातून जनजागृती करण्याचे आवाहन पशूसंवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केले. या शिवाय ग्राम पातळीवरील पाणीपुरवठा योजना ताकदीने चालविण्याच्या सूचना दिल्या. रोहयोंतर्गत शाळा, अंगणवाडीला संरक्षण भिंत बांधण्याची सूचना केली.त्यानंतर त्यांनी मग्रारोहयो अंतर्गत विहिरीचे काम सुरू असलेल्या देवीनगर तांडा येथे प्रत्यक्ष भेट देवून तेथील मजूर व लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मग्रारोहयोअंतर्गत विहिरीबरोबरच फळबाग, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन यासाठी लाभार्थ्यांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून शेतकऱ्यांनी बांधावर वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.
पर्यावरण समतोलासाठी वृक्षारोपण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:12 AM