देशभरात २२ मार्च २०२०पासून रेल्वेची सेवा संपूर्णपणे बंद करण्यात आली. यानंतर ४ ते ५ महिन्यांनी देशभरात केवळ कोविड विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या. या काळात रेल्वेस्थानकांवर गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्मचे तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. त्यानंतर सध्या प्लॅटफॉर्मचे तिकीट पुन्हा दहा रुपये करण्यात आले आहे, असे आदेश रेल्वे विभागाने काढले आहेत. मात्र, दक्षिण मध्य रेल्वे विभागातील परभणी जंक्शन येथे अद्याप स्थानिक रेल्वे प्रशासनाला प्लॅटफॉर्मचे तिकीट दहा रुपये केल्याचे आदेश शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत स्थानकातील चिफ कमर्शियल विभागाकडे प्राप्त झाले नव्हते. यामुळे जुन्याच दोन महिन्यांपूर्वीच्या ३० रुपये दराच्या आदेशाने प्लॅटफॉर्मचे तिकीट दिले जात असल्याचे या विभागाकडून समजले.
स्थानकातून दररोज जाणाऱ्या रेल्वेची संख्या-२०
रोज प्रवास करणाऱ्यांची संख्या-सरासरी ९०० ते १ हजार
तिकीट दर वाढल्याने केवळ फायदा
कोरोना काळात प्लॅटफॉर्म वाढवले तरी लॉकडाऊन असल्याने रेल्वे बंद होत्या. त्यामुळे स्थानकांची कमाई झाली नाही. मात्र, सध्या परभणी स्थानकावरून १८ ते २० रेल्वे दररोज ये-जा करतात. साधे तिकीट मिळत नसल्याने आणि आरक्षणाचे तिकीट दर वाढविल्याने तेवढा फायदा स्थानकाच्या कमाईला झाला आहे.
प्लॅटफॉर्म तिकिटाची कमाई बुडतेय
कोरोनापूर्वी सर्वच स्थानकांवर दहा रुपये एवढा दर प्लॅटफॉर्म तिकिटाला होता. यानंतर कोरोना काळात प्लॅटफॉर्मचे तिकीट ५० रुपये, मग पुन्हा ३० रुपये, त्यानंतर सध्या दहा रुपये असे केले आहे. मात्र, परभणी स्थानक या प्लॅटफॉर्म तिकिटाच्या कमाईपासून कोणताही फायदा घेत नसल्याचे दिसून येते. कारण येथे कोणाचीच तपासणी केली जात नाही. परभणी स्थानक म्हणजे, आओ जाओ गर तुम्हारा, असे बनले आहे. तसेच प्लॅटफॉर्मचे तिकीट काढण्यासाठी स्वतंत्र तिकीट खिडकी नसल्याने आरक्षणाच्या रांगेत थांबून वाट पाहून प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याला प्रवासी, नागरिकही पसंती देत नसल्याचे दिसून येते.
प्रवासी घटले
राज्यात झालेल्या अनलॉकनंतर आता प्रवाशांची संख्या इतर ठिकाणी वाढली आहे. मात्र, यास परभणी स्थानक अपवाद आहे. कोरोनापूर्वी ५० रेल्वेची ये-जा असल्याने एरव्ही दररोज १० हजार साधारण तिकिटे, १५०० आरक्षण तिकिटे यांची विक्री होत होती. सध्या केवळ २० रेल्वे त्याही केवळ एक्स्प्रेस सुरू आहेत, तर पॅसेंजर कायमस्वरूपी बंद असल्याने प्रवासी घटले आहेत. सध्या ४०० ते ५०० आरक्षित तिकीट विक्री दोन आरक्षण खिडकीवरून होत आहे.
यूटीएस ॲपवर काढा प्लॅटफॉर्म तिकीट
परभणी रेल्वेस्थानकावर दोन आरक्षण खिडकी सुरू आहेत. येथे सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत आरक्षण दिले जाते. येथेच प्लॅटफॉर्म तिकीट मिळत असल्याने रांगेत थांबण्याला अनेक जण पसंती देत नाहीत, तर स्थानकावर थेट कागदवर सूचना लिहून यूटीएस ॲपवर प्लॅटफॉर्म तिकीट काढावे, असा आदेश लिहिला आहे. यामुळे उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे.