परभणी : येथील स्त्री रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना बाधीत महिलेची यशस्वी प्रसूती केल्यानंतर आता ही महिला कोरोनामुक्त झाली असून, महिलेसह बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याने २६ ऑगस्ट रोजी या दोघांनाही रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
शहरातील सुपरमार्केट भागातील एक महिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने १७ऑगस्ट रोजी या गरोदर महिलेस स्त्री रुग्णालयात हलविण्यात आले. १८ ऑगस्ट रोजी महिलेला प्रसूती कळा जाणवत असल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. डॉ.कालिदास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ञ डॉ.शरद वाघ, भूलतज्ञ डॉ.अनिल गरड, डॉ. विशाल पवार, डॉ.किरण सोनवे, परिचारिका खंदारे यांच्या पथकाने कोरोनाबाधित असलेल्या महिलेची यशस्वी प्रसुती केली. महिलेने पुत्ररत्नाचा जन्म दिला. यशस्वी प्रसूतीनंतर आता ही महिला कोरोनामुक्त झाली असून, २६ ऑगस्ट रोजी माता आणि बाळास रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
परभणीतील स्त्री रुग्णालयात मोफत आणि चांगली सेवा मिळाली. डॉक्टर आणि परिचारिकांच्या प्रयत्नांमुळे यशस्वी प्रसूती झाली. त्यानंतर आता मी कोरोनामुक्त होऊन घरी परतत आहे, याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया सुटी झाल्यानंतर मातेने दिली आहे.