न्यूमोनिया हा एक संसर्गजन्य आजार असून, प्रामुख्याने बालकांना तो होताे. हिप न्यूमोनिया आणि न्यूमोकोकल न्यूमोनियामुळे साधारणत: अर्भक आणि बालमृत्यू होतात. ते रोखण्यासाठी आता परभणी जिल्ह्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून हे लसीकरण बालकांना देण्यात येणार आहे. नवजात बालकाला दीड महिन्यांनंतर पहिला, साडेतीन महिन्यांनंतर दुसरा आणि नऊ महिन्यांनंतर तिसरा डोस जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपकेंद्रातून दिला जाणार आहे. प्रामुख्याने नवजात अर्भक आणि १ ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचा दोन प्रकारच्या न्यूमोनियामुळे मृत्यू होतो. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आता जिल्ह्यात न्यूमोसिल लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे. परभणी येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अंतर्गत २०१७-१८ मध्ये ९ हजार ४१४ बालकांना जन्म देण्यात आला. त्यामध्ये १५० अर्भकांचा मृत्यू झाला असून, ३ बालमृत्यू या वर्षात झाले आहेत. त्याचबरोबर २०१८-१९ मध्ये ९ हजार २१ बालकांना या स्त्री रुग्णालय अंतर्गत मातांनी जन्म दिला. त्यापैकी ११० अर्भक मृत्यू झाले असून, दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २०१९-२० मध्ये ७ हजार ६३३ बालकांना स्त्री रुग्णालय अंतर्गत मातांनी जन्म दिला असून, त्यामध्ये ८८ अर्भक मृत्यू असून, पाच बाल मृत्यू झाले आहेत. त्यामुळे हे सर्व अर्भक व बालमृत्यू रोखण्यासाठी ६ आठवडे ते ९ महिन्यांतील बालकांना न्यूमोसिल (पिसीव्ही) लस देण्यात येणार आहे.
काय आहे न्यूमोकोकल न्यूमोनिया
न्यूमोकोकल न्यूमोनिया हा श्वसन मार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुप्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ शकतो. खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. जर आजार गंभीर असेल तर मुलांना खाण्या व पिण्यात अडचण येऊ शकते, फिट येऊ शकते, बेशुद्ध हाेऊ शकतात व मृत्यूदेखील होऊ शकतो.
- ड्रॉ. किशोर सुरवसे, वैद्यकीय अधिकारी, परभणी.
परभणी जिल्ह्यासाठी न्यूमोकोकल ही (पीसीव्ही १०) लस उपलब्ध झाली आहे. एकूण २३ हजार डोसेस प्राप्त झाले असून, आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही अंतिम टप्प्यात आहे. शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार जिल्ह्यात लसीकरण सुरू केले जाणार आहे.
- डॉ. रावजी सोनवणे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, परभणी.