सोनपेठ (जि़परभणी)- तालुक्यातील चुकार पिंप्री गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या आवलगाव शिवारातील एका खाजगी विहिरीत विषारी द्रव्य टाकल्याची घटना घडली असून, या प्रकरणी १७ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास सोनपेठ ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सोनपेठ तालुक्यातील आवलगाव शिवारात चुकार पिंप्री येथील संदीप डोंगरे यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतीत विहीर आहे़ या विहिरीतून २ किमी अंतरावर ८६५ लोकसंख्या असलेल्या चुकार पिंप्री येथील ग्रामस्थ दररोज पिण्यासाठी पाणी घेऊन जात असतात़ १७ जूनपासून गाव परिसरातील वीज पुरवठ्याची पहाटेची वेळ बदलून ती सकाळी ८ ची करण्यात आली होती़ त्यामुळे दररोज सकाळी ६ वाजता या विहिरीवर पिण्याचे पाणी घेऊन जाण्यासाठी येणारे ग्रामस्थ १७ जून रोजी सकाळी ६ वाजता विहिरीवर आले नाहीत़ नियमितपणे संदीप डोंगरे शेतात गेले व त्यांनी सकाळी ७ च्या सुमारास विहिरीतील पाणी पाहिले असता, पाण्याचा रंग पिवळा दिसला़ त्यानंतर त्यांना संशय आल्याने त्यांनी आणखी जवळ जाऊन पाहिले असता, त्यांना उग्र विषारी द्रव्याचा वास आला़ याबाबत त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना माहिती दिली व विहिरीवर पाण्यासाठी कोणीही येऊ नये, असे आवाहन केले़ त्यानंतर, कोणतीतरी अज्ञात व्यक्तीने १६ जूनच्या रात्री ८ ते १७ जूनच्या सकाळी ७ च्या दरम्यान विहिरीत विषारी द्रव्य टाकल्या प्रकरणी तक्रार सोनपेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली़ त्यावरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध पोलिसात १७ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे़