माझ्या मुलाला मारून पोलिसांनी हाडे मोडली; मृत सोमनाथच्या आईने मांडली राहुल गांधींसमोर व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 09:54 IST2024-12-24T09:54:37+5:302024-12-24T09:54:48+5:30
माझ्या मुलाला न्याय द्यावा. संबंधितांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली

माझ्या मुलाला मारून पोलिसांनी हाडे मोडली; मृत सोमनाथच्या आईने मांडली राहुल गांधींसमोर व्यथा
परभणी : पोलिसांच्या मारहाणीत माझ्या मुलाची हाडे मोडली. माझ्या मुलाला अटक केली तर मला साधी माहितीही दिली नव्हती. पोस्टमॉर्टममध्ये सगळे आले तरीही त्याला गंभीर आजार होता, असे चुकीचे सांगत आहेत, अशी व्यथा मृत सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजया सूर्यवंशी यांनी सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोर मांडली.
माझ्या मुलाला न्याय द्यावा. संबंधितांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. राहुल गांधी यांनी सोमवारी नवा मोंढा भागात जाऊन न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, खा. वर्षा गायकवाड, खा. प्रणिती शिंदे, आ. विजय वडेट्टीवार, आ. अमित देशमुख, आ. नितीन राऊत, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे, खा. चंद्रकांत हंडोरे, खा. फौजिया खान, खा. संजय जाधव, आ. प्रज्ञा सातव, आ. राहुल पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. गांधी यांनी जवळपास २० ते २५ मिनिटे सूर्यवंशी कुटुंबीयांशी चर्चा केली.
शवचिकित्सा अहवाल मानवाधिकार आयोगाकडे
छत्रपती संभाजीनगर : परभणी येथे न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल सोमवारी नवी दिल्लीतील राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाला (एनएचआरसी) पाठविण्यात आला. यात ‘प्रोव्हिजन काॅज ऑफ डेथ रिपोर्ट’, १३ पानी शवचिकित्सा अहवाल, शवविच्छेदन करताना केलेल्या व्हिडिओ शूटिंगचे मेमरी कार्ड व ४२ छायाचित्रे यांचा समावेश आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शवविच्छेदनगृहात १६ डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पार्थिवाचे तब्बल ३ तास ‘इन कॅमेरा’ पोस्टमार्टेम करण्यात आले होते. शवविच्छेदन होताच एक पानी ‘प्रोव्हिजन काॅज ऑफ डेथ रिपोर्ट’ देण्यात आला.
अनेक जखमांमुळे सोमनाथ सूर्यवंशी हे शाॅकमध्ये गेल्याने मृत्यू झाल्याचे या प्राथमिक अहवालात नमूद केले होते. त्यांच्या पार्थिवाची सीटी स्कॅन तपासणी केली होती. व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी राखीव ठेवला आहे.