परभणी : समशेर खान यांच्या मृत्यू प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एम़ए़ रौफ यांना बुधवारी औरंगाबाद येथे गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली़ रौफ हे मागील दोन महिन्यांपासून जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते़ बुधवारी न्यायालयाने जामीन फेटाळताच त्यांना अटक करण्यात आली़संगमनेर येथील एका वाहन चोरीच्या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी १९ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अपना कॉर्नर येथून समशेर शामीर खान यांना ताब्यात घेतले होते़ याच प्रकरणात समशेर खान यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली़ जबर मारहाणीमुळे समशेर खान हे बेशुद्ध पडले़ त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले़ परंतु, तेथे सायंकाळी ७ च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले़ या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण तयार झाले होते़ तत्कालीन पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले़ चौकशीअंती तत्कालीन पोलीस निरीक्षक एम़ए़ रौफ, जमादार तुळसीदास देशमुख आणि शेख मुश्ताक यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला होता़या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी तिघांनीही परभणी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला़ जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रौफ यांनी जामीनासाठी अर्ज केला होता़ मागील दोन महिन्यांपासून हे प्रकरण सुरू होते़ २० सप्टेंबर रोजी खंडपीठाचे न्या़ व्ही़ जाधव यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली़ यावेळी सरकार पक्षाच्या वतीने अॅड़ जगतकर यांनी काम पाहिले़ न्यायालयाने रौफ यांचा जामीन फेटाळला व पोलिसांकडे स्वाधीन होण्याचे आदेश दिले़ सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक सुधाकर सुरडकर, पोलीस उपअधीक्षक पठाण यांच्यासह पोलीस निरीक्षक चव्हाण, थेटे यांच्या पथकाने रौफ यांना न्यायालयाच्या परिसरातच अटक केली़ रौफ यांना २१ सप्टेंबर रोजी परभणी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याची माहिती सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक सुधाकर सुरडकर यांनी दिली़
पोलीस निरीक्षक रौफ यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:03 PM
समशेर खान यांच्या मृत्यू प्रकरणात नानलपेठ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एम़ए़ रौफ यांना बुधवारी औरंगाबाद येथे गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली़
ठळक मुद्देसमशेर खान खून प्रकरण खंडपीठाने फेटाळला जामीन