ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी जिल्ह्यात सुरू झाली असून, १६ जानेवारी रोजी या निवडणुकीत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. त्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मतदानाच्या दिवशी लागणारा बंदोबस्तही नियुक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, परजिल्ह्यातूनही बंदोबस्त दाखल झाला आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायतीच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन निवडणुका शांततेत पार पडण्याचे आवाहन केले आहे. १६ जानेवारी रोजी लागणाऱ्या बंदोबस्ताची पोलीस प्रशासनाने संपूर्ण तायरी करून ठेवली आहे.
याचाच एक भाग म्हणून ११ जानेवारी रोजी जिल्ह्यातील संवेदनशील ग्रामपंचायती, त्याचप्रमाणे मोठ्या ग्रामपंचायतीत पोलीस कर्मचाऱ्यांची पथसंचलन करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले आहे. पूर्णा, ताडकळस, जिंतूर, परभणी, पाथरी, पालम, गंगाखेड या तालुक्यांमध्ये अनेक गावांत पथसंचलन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केली असून, कुठेही कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
८९ ग्रामपंचायती संवेदनशील
जिल्ह्यात ८९ ग्रामपंचायती संवेदनशील असल्याची मािहिती पोलिसांनी दिली. या सर्व ग्रामपंचायतींमध्ये रुट मार्च करण्यात आले आहे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी गावात बैठक घेऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे, ८५ सेक्टरची जिल्ह्यात निर्मिती करण्यात आली असून, या सेक्टरच्या साह्याने संवेदनशील बुथवर देखरेख ठेवली जाणार आहे.
एकूण ग्रामपंचायती
५६६
बिनविरोध ग्रामपंचायती
६७
निवडणूक होत असलेल्या ग्रा.पं.
४९९
एकूण मतदान केंद्र
१,५८२