परभणी : मुख्याध्यापक असलेल्या भावाने पोलीस पाटील भरतीचा पेपर द्यायला आलेल्या भावाला हावभाव व हातवारे करून उत्तरे पुरविल्याचे समोर आले. याप्रकरणी मुख्याध्यापकासह परीक्षार्थीवर १६ मार्च रोजी नानलपेठ पोलिस ठाण्यात प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चार उपविभागाअंतर्गत ३०५ रिक्त पोलीस पाटील पदासाठी २८ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली. २ हजार २०८ जणांनी परीक्षा दिली. यामध्ये परभणी तालुक्यातील जोडपरळी येथील जागा अनुसूचित जाती सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव होती. या जागेकरता नानलपेठ येथील बालविद्या मंदिर शाळेचा केंद्रावर सुमेध दत्तराव राऊत या परीक्षार्थीने परीक्षा दिली. त्यानंतर सुमेध राऊत याची पोलीस पाटील पदी निवडही झाली. प्रशासनाकडून त्यांना नियुक्ती पत्रही देण्यात आले. परंतु नियुक्तीनंतर १५ फेब्रुवारी रोजी काही परिक्षार्थींनी जोडपरळी येथील पोलीस पाटील पदाकरता घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे निवेदन तहसील प्रशासनाला दिले. या निवेदनामध्ये संबंधितावर कारवाई करावी, असा लेखी आक्षेप सादर केला. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
या चौकशीमध्ये परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये परीक्षार्थी सुमेध दत्तराव राऊत यांना मुख्याध्यापक असलेला त्यांचा भाऊ कचरू दत्तराव राऊत यांनी हावभाव व हातवारे करुन उत्तरे पुरविल्याचे पुढे आले. त्यानंतर प्रशासनाकडून तलाठी रुपेश घोडके यांनी नानलपेठ पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून परीक्षा सुरू असताना हावभाव व हातवारे करून उत्तरे पुरविले तसेच शासनाची फसवणूक करून पोलीस पाटील पद प्राप्त करून घेतल्याप्रकरणी मुख्याध्यापक कचरू दत्तराव राऊत व परीक्षार्थी सुमेध दतराव राऊत (दोघे रा. जोडपरळी ता. परभणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
या प्रकारावेळी प्रशासन कुठे?परभणी शहरातील नानलपेठ परिसरातील बाल विद्यामंदिर परीक्षा केंद्रावर गैरप्रकार झाल्याची तक्रार तहसील प्रशासनाला केशव हिरामण राऊत व इतरांनी केली. त्यानंतर प्रशासन कामाला लागले. परीक्षा केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांवर गुन्हा दाखल केला. परंतु हा सर्व प्रकार सुरू असताना परीक्षा केंद्रावरील प्रशासन काय? करत होते. याबाबत मात्र आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.