पाथरी ( परभणी) : वाळूची चोरी केल्या प्रकरणी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार मानवत तालुक्यातील कोथळा येथील पोलीस पाटील आनंद पाते यांना निलंबित करण्यात आले.
परभणी जिल्ह्यात गौण खनिज चोरी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतली आहे. ठीक ठिकाणी अवैध रित्या साठून ठेवलेल्या वाळू साठे जप्त करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हे ही दाखल करण्यात आली आहेत. या मोहिमेत पाथरी उपविभाग अंतर्गत मानवत तालुक्यातील कोथळा येथे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी 30 डिसेंबर 2017 रोजी अचानक भेट दिली. त्या वेळी गावठाण मध्ये अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहन (क्र mh 22 H 6836) आढळून आले. या वाहनात कोणत्याही प्रकारचे गौण खनिज वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आले. अधिक माहिती घेतली असता हे वाहन कोथळा येथीलच पोलीस पाटील आनंद पाते यांचे असल्याचे कळाले.
यानंतर शासकीय कामावर असताना अवैध वाळू चोरी प्रकरणी महसूल विभागाने त्याना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र याचा खुलासा समाधानकारक न आल्याने तहसीलदार मानवत यांनी वाळू चोरी प्रकरणी पाते दोषी असल्याचे आढळुन आल्याचा अहवाल उपजिल्हाधिकारी पाथरी यांना सादर केला. या नुसार महाराष्ट्र ग्रामीण पोलीस अधिनियम 1967 च्या नमूद कलमान्वये पाते यांना निलंबनाचे आदेश उपजिल्हाधिकारी सि. एस. कोकणी यांनी दिले.
पहिली कारवाईगौण खनिज चोरी प्रकरणी एखाद्या पोलीस पाटील यांच्यावर निलंबनाची परभणी जिल्ह्यात अशी पहिली कारवाई झाली आहे, जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या धडक कारवाई ने मात्र अवैध गौण खनिज चोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.