लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील दैठणा आणि पाथरी येथे पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी रात्री छापे टाकून जुगार खेळणाऱ्या ११ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच अवैध दारू विक्रीविरुद्धही कारवाई केली आहे.थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरूद्ध मोहीम सुरू केली आहे़ दोन दिवसांपासून अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांवर छापे टाकले जात आहेत़ दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोखर्णी शिवारातील ओढ्याच्या बाजुला जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ स्थानिक गुन्हा शाखेचे पथक २५ डिसेंबर रोजी रात्री या ठिकाणी दाखल झाले तेव्हा ११ आरोपी झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले़ य आरोपींकडून पोलिसांनी ३३ हजार ५७० रुपये, मोटारसायकल, मोबाईल असा सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक सुनील गोपीनवार यांच्या फिर्यादीवरून दैठणा पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोपीनवार, हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, श्याम काळे, निलेश भुजबळ, जमीरोद्दीन फारुखी, किशोर भुमकर, हरि खुपसे, शंकर गायकवाड, शेख ताजोद्दीन यांच्या पथकाने केली़ जिल्ह्यात दोन दिवसांपासून अवैध धंद्यांविरूद्ध पोलिसांनी छापे टाकण्याची मोहीम सुरू केली आहे़माळीवाडा येथेही कारवाईपोलिसांनी अवैध दारू विक्री विरूद्धही छापे टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे़ या अंतर्गत २५ डिसेंबर रोजी पाथरी शहरातील माळीवाडा परिसरात चोरटी दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला़ माळीवाडा येथील राजेश लक्ष्मण कांबळे व रमेश रामभाऊ कांबळे यांच्या ताब्यातून दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत़ पकडलेली दारू नष्ट करून आरोपींविरूद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़
परभणी जिल्ह्यात दैठणा, पाथरीत पोलिसांचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:24 AM