परभणी : जिल्ह्यात सन २०२१ ते २०२३ या कालावधीत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे २५ लाखांचे १५६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
जिल्हा पोलीस दलाने पाच ते १३ ऑगस्ट दरम्यान ही विशेष मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक रागसूधा.आर. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण व सर्व पोलीस ठाण्याच्या ३६ अंमलदारांनी सायबर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या मोहिमेत तपासासाठी मदत केली. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यामध्ये सन २०२१ ते जुलै २०२३ कालावधीत दाखल गहाळ मालमत्तेचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविण्यात आली. यात परभणीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून गहाळ झालेले २५ लाख २७ हजार ९१३ रुपयांचे एकूण १५६ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. संबंधित मोबाईल हे न्यायालयाच्या प्रक्रियेप्रमाणे गुन्हा नोंद असलेल्यांना परत देण्याची प्रक्रिया सायबर व जिल्हा पोलीस विभागाकडून केली जाणार आहे.