परभणी : शहरातील एमआयडीसी परिसरात एक नवीन पोलीस ठाणे मंजूर करण्यास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मकता दर्शविली असून, लवकरच या भागात पोलीस ठाणे उभारले जाईल, अशी माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.
आ.डॉ.राहुल पाटील यांनी २० सप्टेंबर रोजी गृहमंत्री वळसे पाटील यांची मुंबई येथे भेट घेतली. परभणी शहरात नवीन पोलीस ठाणे उभारण्यासंदर्भात त्यांना निवेदन देत या प्रश्नावर चर्चा केली. नवा मोंढा पोलिस ठाण्याअंतर्गत औद्योगिक वसाहत परिसरासह शहरातील अनेक वसाहती समाविष्ट आहेत़. तसेच ताडकळस पोलीस ठाण्या अंतर्गतही अनेक गावांचा समावेश आहे़. या दोन्ही पोलीस ठाण्यांमधील अंतर जवळपास ४० किलोमीटर आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यामध्ये काम असणाºया नागरिकांना दोन्ही पोलीस ठाणे लांब पडत आहेत़. तसेच या दोन्ही पोलीस ठाण्यांवर कामाचा ताण देखील वाढत असल्याचे आ. डॉ. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले़. तेव्हा या दोन्ही पोलीस ठाण्याचे विभाजन करून औद्योगीक वसाहत परभणी येथे नवीन पोलीस ठाणे निर्मितीस मंजुरी द्यावी, अशी मागणी आ.डॉ. पाटील यांनी केली. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीला मंजुरी देण्यात येईल, अशी ग्वाही वळसे पाटील यांनी दिली आहे, असे आ.डॉ. पाटील यांनी सांगितले.