परभणी : गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनास आर्थिक व्यवहार करीत सोडून दिल्याने गंगाखेड पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.
तंबाखूजन्य पदार्थांना राज्यात बंदी आहे. १६ नोव्हेंबर रोजी शहरातून एक वाहन चोरून गुटख्याची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलीस नाईक वसंत रामकिशन निळे यांना मिळाली. त्या आधारे वसंत निळे यांनी सारडा कॉलनी भागातील लाकडी मशीनजवळ गुटख्याची वाहतूक करणारे हे वाहन पकडले. त्यावेळी वाहनात गुटख्याचा साठा असल्याचे निदर्शनास आले. मात्र वाहनचालक, मालकांकडून पैसे स्वीकारुन कोणतीही कारवाई न करता निळे यांनी हे वाहन सोडून दिले.
विशेष म्हणजे, किरकोळ रजेवर असताना निळे यांनी हा प्रकार केला. याप्रकरणी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीवरुन पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी वसंत निळे यांना २३ नोव्हेंबर रोजी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. त्यामुळे गुटख्याचे वाहन कारवाई न करता परस्पर सोडून देणे पोलीस कर्मचाऱ्यास चांगलेच महागात पडले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही गंगाखेड पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन झालेले आहे.