जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे २००५ ते २००७ या कालावधीत सोनपेठ तालुक्यातील विटा ग्रामपंचायतीचे सरपंच होते. त्यानंतर त्यांनी २००७ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१२ च्या निवडणुकीतही ते विजयी झाले. २०१४ ते २०१७ या कालावधीत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर २०१९ ची लोकसभा निवडणूक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढविली. त्यात त्यांना तब्बल ४ लाख ९६ हजार ७४२ मते मिळाली होती. माजी आ. माणिकराव आंबेगावकर हे मानवत तालुक्यातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे १९८२ ते १९९२ सरपंच होते. त्यानंतर त्यांनी सिंगणापूर विधानसभा मतदार संघातून १९९९ मध्ये विजय मिळविला होता. सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथील ग्रा.पं. सदस्य राजेंद्र लहाने हे २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर २०१४ ते २०१७ या कालावधीत ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अशोक काकडे हे कवधड ग्रामपंचायतीचे सदस्य होते. जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे हे रेणापूर ग्रामपंचायतीचे सरपंच होते.
जिंतूर तालुक्यातही अनेकांनी मिळविली पदे
जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी इंदुमती घुगे या विराजमान झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी जि.प.निवडणुकीत विजय मिळविला. त्यानंतर जि.प.च्या बाल व बाकल्याण सभापती पदावर त्यांची निवड झाली होती. तसेच चारठाणा येथील मीनाताई राऊत याही ग्रा.पं. निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्यानंतर जि.प. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी बांधकाम सभापती पद मिळिवले.
असे घडले नेतृत्व !
लातूर जिल्ह्यातील बाभळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री होण्याचा दिवंगत विलासराव देशमुख यांचा आदर्श आजही अनेक ग्रा.पं. सदस्यांसमोर आहे. त्यानुसारच अनेकांची वाटचाल सुरू आहे.
ग्रामपंचायत पातळीवर निवडणूक लढविल्यानंतर अनेकांनी पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत यश मिळवून राजकीय वाटचालीला सुरुवात केली. त्यामध्ये बहुतांश नेते मंडळींना यश आले.
ग्रामपंचायत पातळीवर काम केल्यानंतर गावाच्या समस्या सोडवित असताना आलेले अनुभव पुढे राजकीय जीवनात वाटचाल करताना कामी येतात. त्यातूनच अनेकांनी यशस्वी वाटचाल केल्याचे दिसून येते.