पाथरी (परभणी ) : तालुक्यातील नाथरा ग्रामपंचायतच्या सरपंच मिरा अंकुशराव वाकणकर यांच्याविरोधातील अविश्वास ठराव चार विरुद्ध एका मताने आज मंजूर झाला. यामुळे या गावाला आतापर्यंत ४ वर्षात ३ सरपंच लाभले. तसेच 4 सदस्य विविध कारणाने अपात्र झाले आहेत
नाथरा येथील ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणूक ऑगस्ट 2015 मध्ये झाली. या ग्रामपंचायतमध्ये एकूण 9 सदस्य आहेत. यातील ३ सदस्य ६ महिन्यांपूर्वी जातपडताळणी प्रमाणपत्र दाखल न केल्याने अपात्र ठरले. तर एक सदस्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यामुळे सध्या या ग्रामपंचायतमध्ये पाचच सदस्य आहेत. सरपंच मिरा अंकुशराव वाकणकर यांच्यावर १० मे रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. आज तहसीलदार भाग्यश्री देशमुख यांच्या उपस्थितीत यावर मतदान घेण्यात आले. चार विरुद्ध एक अशा फरकाने हा ठराव पारित करण्यात आला. एक वर्षात दोन वेळेस अविश्वास ठराव दाखल करणारे नाथरा हे एकमेव गाव ठरले आहे.
3 सरपंच पायउतारसुरुवातीला सुरेखा ज्ञानेश्वर श्रीरंग सरपंच झाल्या. यानंतर मीरा धर्मराज वाकणकर या सरपंच झाल्या त्यानाही एक वर्षाच्या आत पायउतार व्हावे लागले. काही महिन्यांपूर्वी तिसऱ्यांदा सरपंच पदाची निवडणूक होऊन मीरा अंकुश वाकणकर यांची निवड झाली होती. आज त्यांना सुद्धा पायउतार व्हावे लागले. यामुळे या गावाने ४ वर्षात ३ सरपंच पाहीले असून आता लवकरच चौथ्या सरपंचाची निवड होईल.