खराब रस्त्यांमुळे वाहनचालक वैतागले
परभणी : जिल्ह्यात सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. काही रस्त्यांची कामे सुरु असल्याने त्या मार्गावर वाहतूक करणे अडचणीचे ठरत आहे. तर काही रस्त्यांवर खड्डे असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. परभणी-जिंतूर, परभणी-गंगाखेड, परभणी-वसमत या तीनही रस्त्यांची कामे केली जात आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण रस्तेही खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे वाहनचालक वैतागले आहेत.
पिकांच्या सिंचनासाठी विजेचा अडथळा
परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागात विजेची समस्या वाढली आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने सिंचनाच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. महावितरणने कृषी पंपासाठी दिवसा सलग ८ तास वीजपुरवठा करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
नव्या वसाहतींमध्ये नागरी समस्या
परभणी : शहरालगत नव्याने वसलेल्या वसाहतींमध्ये नागरिकांना मुलभूत सुविधा नसल्याने समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्ते, पाणी आणि वीज या सुविधा अनेक वसाहतींमध्ये अद्याप उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. महानगरपालिका प्रशासनाने नवीन वसाहतीत किमान मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
दुभाजकाच्या कडेने साचली माती
परभणी : शहरातील जिल्हा स्टेडियमसमोरील रस्त्यावरील दुभाजकाच्या कडेने मोठ्या प्रमाणात माती साचली आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता केल्यानंतर रस्त्यावरील माती दुभाजकाच्या कडेला लोटून दिली जाते. मात्र, दिवसभराच्या वाहतुकीमुळे ही माती पुन्हा वातावरणात मिसळून धूळ वाढत आहे. तेव्हा दुभाजकाच्या कडेची माती उचलावी, अशी मागणी होत आहे.
निधीअभावी रखडली विकासकामे
परभणी : जिल्हा नियोजन समितीचा निधी उपलब्ध झाला असला तरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे हा निधी संबंधित कामांसाठी वितरीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे विकासकामे ठप्प आहेत. आधीच निधी नसल्याने कामे ठप्प आहेत आणि आता निधी उपलब्ध झाला तर आचारसंहिता असल्याने कामे ठप्प आहेत. त्यामुळे विकासकामांना सुरुवात करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता शिथील होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.