रब्बी हंगामात उत्पन्न
वाढण्याची शक्यता
परभणी : जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होत आहे. त्यामुळे या हंगामातील गहू, हरभरा या पिकांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. शिवाय यंदा प्रथमच उसाचे क्षेत्र वाढल्याने ऊस उत्पादनातूनही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पातून या हंगामात आतापर्यंत दोन पाणी आवर्तने मिळाली आहेत. त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होत आहे.
शासकीय कार्यालयांत स्वच्छतेची कामे
परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारत परिसरातील विविध शासकीय कार्यालये तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रजासत्ताक दिन दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, त्याची जय्यत तयारी शहरात सुरू झाली आहे.
जायकवाडीच्या कालव्यात साचला गाळ
परभणी : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात जागोजागी गाळ साचला आहे. त्यामुळे पाण्याची वहन क्षमता कमी झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी दोन वेळा पाणी आवर्तन सोडण्यात आले. प्रकल्पाचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी कालव्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरातील सिमेंट रस्त्याला गेले तडे
परभणी : येथील पारदेश्वर मंदिर ते जुना पॉवर हाऊस या सिमेंट रस्त्याला तडे गेले असून, या रस्त्यावर किरकोळ अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या मधोमध तडे पडल्याने वाहने घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. महानगरपालिकेने या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
पीक कर्जाच्या वाटपाला मिळेना गती
परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप संथगतीने होत आहे. संपूर्ण रब्बी हंगाम संपत आला तरी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले नाही. विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रब्बी हंगामात प्राधान्याने पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही बँकांनी कर्ज वाटपासाठी हात आखडता घेतला आहे.
बसस्थानक परिसरात सुविधांचा अभाव
परभणी : येथील बसस्थानक परिसरात प्रवाशांना कोणत्याच सुविधा उपलब्ध होत नाहीत. पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था या सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. त्याचप्रमाणे येथील सीसी टीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आगारप्रमुखांनी याकडे लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.