परभणी : आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या ३ हजार ५४९ अहवालांमध्ये केवळ २६ रुग्णांची नोंद झाली असून, कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट एक टक्क्यापेक्षाही कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. गुरुवारी दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात घटला आहे. बाधित रुग्णांची संख्या दोन आकड्यांवर येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाने तपासण्या वाढविल्या तरीही बाधित रुग्णांची संख्या दोन आकड्यांच्या पुढे जात नसल्याने दिलासा मिळत आहे. आरोग्य विभागाला ३ हजार ५४९ नागरिकांचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. त्यामध्ये २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. आरटीपीसीआरच्या २ हजार ७४७ अहवालात १६ आणि रॅपिड टेस्टच्या ८०२ अहवालांमध्ये १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.७७ टक्के नोंद झाला आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असला, तरी बाधित रुग्णांचे मृत्यू थांबलेले नाहीत. गुरुवारी दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात एक आणि खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजार ३४० झाली असून, ४८ हजार १९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २५६ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ८९० रुग्ण उपचार घेत आहेत.
८८ रुग्णांना सुटी
कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. गुरुवारी ८८ रुग्णांना सुटी देण्यात आली. या रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.