परभणी-जिंतूर या महामार्गाच्या नवनिर्माणासाठी केंद्र सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून मागील दोन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. याच रस्त्यावर परभणी शहरालगत असलेल्या भारतनगर परिसरात जायकवाडी कालव्यावर मोठा पूल उभारण्यात आलेला आहे. या पुलाचे बांधकाम खूप वर्षांचे असल्याने सद्यस्थितीत हा पूल मोडकळीस आला आहे. या पुलाची नव्याने उभारणी करावी, अशी मागणी अनेक वेळा नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. मात्र, या विभागाने सातत्याने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. सद्यस्थितीत या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या पुलावरून वाहनधारकांना वाहने चालविताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यातच पुलावरील खड्ड्यांमध्ये मागील आठ दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे पुलावरील खड्डे वाहनधारकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन या पुलाची नव्याने निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
पुलावरील खड्ड्याने वाहनधारकांचे जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:12 AM