कुपटा : सेलू तालुक्यातील कान्हड येथील ३३ केव्ही उपकेंद्रावरून वीज पुरवठा करण्यात येणाऱ्या सिमनगाव आणि गूळखंड या दोन गावचा वीज पुरवठा थकीत वीज बिलामुळे दोन दिवसांपूर्वी खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
कान्हड येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून कान्हड, भांगापूर, सिमनगाव, हट्टा, कुपटा, गूळखंड, गव्हा, कौसडी, आडगाव आदी १७ गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. या वीज पुरवठ्यापोटी ग्राहकांना दर महिन्याला देयके दिली जातात. मात्र, वीज महावितरणचे कर्मचारी वर्षभर या बिल वसुलीकडे दुर्लक्ष करतात. वरिष्ठस्तरावरून मार्च एंडसाठी वीज बिलाची वसुली करण्याचे आदेश दिल्यानंतर सरळ वीजपुरवठा खंडित करण्याचे काम या कर्मचाऱ्यांकडून केले जाते. त्यामुळे एरव्ही ग्रामीण भागात न फिरणारे कर्मचारी वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित करून मोकळे होतात. विशेष म्हणजे सिमनगाव येथील ग्रामस्थांनी ४० हजार रुपयांचा भरणा वीज वितरण कंपनीकडे केला आहे. मात्र, तरीही या गावचा वीजपुरवठा महावितरणने सुरू केलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून, दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
‘‘सिमनगाव येथील ग्रामस्थांनी वीज बिलापोटी ४० हजार रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे. मात्र, अद्यापही आमच्या गावाचा वीजपुरवठा सुरळीत केलेला नाही.
-विष्णू काकडे, ग्रामस्थ, सिमनगाव
‘‘ ९ गावांचा कारभार सांभाळण्यासाठी मी एकटाच कर्मचारी असून, वसुलीचीही जबाबदारी माझ्यावरच आहे. नागरिकांनी आपल्या बिलातील ३० टक्के रक्कम भरून वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे.
-अब्दुल खालेद, लाइनमन