लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. १६ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून या गावांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. तर १०३ विहिरी अधिग्रहित करुन या विहिरींचे पाणी टंचाईग्रस्त गावासाठी खुले करुन दिले आहे.जिल्ह्यात प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होत असतानाच दुसरीकडे टंचाईग्रस्त गावांची संख्याही वाढत चालली आहे. मागील आठवड्यात १२ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. त्यात आता आणखी चार गावांची भर पडली आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाला धावपळ करावी लागत आहे. सद्यस्थितीत उपलब्ध झालेल्या माहिती नुसार पूर्णा तालुक्यातील ५ गावांना पाच टँकरद्वारे, पालम तालुक्यातील ३ गावे व २ वाड्यांना ६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गंगाखेड तालुक्यात ४ तर जिंतूर तालुक्यात एका गावाला टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा होत आहे. पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाने टँकरसह विहिरीचे अधिग्रहण करण्याची कामे हाती घेतली आहेत. जिल्ह्यात १०३ विहिरींचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले होते. या सर्व विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये सर्वाधिक ४१ विहिरी अधिग्रहित केल्या असून जिंतूर तालुक्यात २१, पालम २० , पूर्णा १७, पाथरी २ आणि मानवत व सेलू तालुक्यात प्रत्येक १ विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. ६२ गावे आणि २३ वाड्यांना अधिग्रहित केलेल्या विहिरींचे पाणी पुरविले जात आहे. एकंदर जिल्ह्यामध्ये टंचाई वाढत चालली असून जिल्हा प्रशासनाने ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी टंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य दिले आहे. आगामी काळात ग्रामीण भागातून दाखल होणाऱ्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी द्यावी व ग्रामीण भागातील टंचाई निवारणासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.या गावांमध्ये टँकरचे पाणीपालम तालुक्यात मौजे रामपूर व रामपूर तांडा, नाव्हा, चाटोरी, आनंदवाडी, पूर्णा तालुक्यात पिंपळा लोखंडे, हिवरा, वाई (लासीना), लोण खु., आहेरवाडी, गंगाखेड तालुक्यात खंडाळी, विळेगाव, गुंडेवाडी, उमरा नाईक तांडा आणि जिंतूर तालुक्यामध्ये मांडवा येथे टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
परभणीत १६ टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:58 AM