परभणी : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला गांभीर्याने घेऊन या काळात लागणाऱ्या ऑक्सिजन साठ्याची सर्व प्रक्रिया अगोदरच पूर्ण करून घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी १० ऑगस्ट रोजी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी गोयल यांनी मंगळवारी आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. तीन तास ही बैठक चालली. यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे अनुभव लक्षात घेता, तिसऱ्या लाटेला अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावे. ॲंटिजन, आरटीपीसीआर चाचण्या त्याचप्रमाणे लसीकरण वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच संसर्ग काळात ऑक्सिजन भासणारी गरज लक्षात घेता, ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी आधीच सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी गोयल यांनी जिल्ह्यातील उपलब्ध बेड, ऑक्सिजनचा साठा यांचा आढावा घेतला. तसेच मागील कोरोना संसर्ग काळात केलेल्या कामाचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर, उपजिल्हाधिकारी संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, ओमप्रकाश यादव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रकाश डाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ किशोर सुरवसे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, डॉ. कालिदास चौधरी, डॉ. के. पी. धुतमाल, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना सावंत, कैलास सोमवंशी आदींची उपस्थिती होती.