लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून भिज पावसाला सुरुवात झाली असून, सर्वदूर होत असलेल्या या पावसामुळे जिल्ह्याची भूजल पातळी वाढून काही प्रमाणात पाणी समस्येपासून दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.दीड महिन्याच्या खंडानंतर शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी व शनिवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना दिलासा मिळाला होता. पावसाअभावी माना टाकत असणारी पिके या पावसाने तरारली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवात जिव पडला. या पावसाने बळीराजा सुखावला तरी पाण्याचा प्रश्न मात्र कायम आहे. त्यामुळे जिल्हावासियांना पाणी टंचाईची धास्ती लागून राहिली आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी पाऊस बरसला नाही. त्यामुळे मंगळवारी पाऊस होतो की नाही, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र सोमवारी मध्यरात्रीपासूनच वातावरणात बदल झाला. परभणी शहर व परिसरात सकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली. कधी मध्यम स्वरुपाचा तर कधी रिमझीम पाऊस बरसत राहिला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले आहे.परभणी शहराबरोबरच गंगाखेड तालुक्यातही सोमवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस होत असून, शहरातील रस्ते चिखलमय झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांत पाणी साचल्याने वाहनधारक, पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे.मानवत, पाथरी, सेलू, जिंतूर, पालम, पूर्णा या तालुक्यांतही दिवसभर रिमझिम पाऊस झाला. एकंदर मंगळवारी झालेल्या भिज पावसामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही दिवस का होईना; पाण्याची समस्या मिटण्याची आशा जिल्हावासियांना आहे.चोवीस तासांत : सरसरी ३.२६ मि.मी. पावसाची झाली नोंद४मंगळवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ३.२६ मि.मी. पाऊस झाला. परभणी तालुक्यात २.५१ मि.मी., पालम ४.६७, पूर्णा: ३.२०, गंगाखेड : ५.७५, सोनपेठ : ४, सेलू : २, पाथरी: २.३३, जिंतूर : १.१७ आणि मानवत तालुक्यात ३.६७ मि.मी. पाऊस झाला आहे.४जिल्ह्यात आतापर्यंत १८१.८७ मि.मी. पाऊस झाला असून, मानवत तालुक्यात सर्वाधिक २३३ मि.मी. आणि पालम तालुक्यात सर्वात कमी १४८ मि.मी. पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे परभणी तालुक्यात १५९ मि.मी, पूर्णा : २०५, गंगाखेड १७१, सोनपठ : १८९, सेलू : १५८, पाथरी : १७६ आणि जिंतूर तालुक्यात १९३ मि.मी. पाऊस झाला आहे.नदी, नाले, प्रकल्प कोरडेठाकच !४परभणी जिल्ह्यात मंगळवारी सकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली असली तरी जिल्ह्यातील गोदावरी, पूर्णा या नद्या कोरड्याठाक आहेत.४या नद्यांमध्ये अद्याप पाणीच दाखल झाले नाही. त्याचप्रमाणे सर्व प्रकल्प कोरडेठाक असल्याने जिल्हावासियांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
परभणी जिल्ह्यात पावसाची रिपरिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:15 AM