लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : आरोग्य खात्यात नोकरी लावतो म्हणून फसवणूक केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून गंगाखेड पोलिसांनी ५५ सुशिक्षित बेरोजगारांच्या नावाने तयार केलेले बनावट नियुक्तीपत्र जप्त केले आहेत.तालुक्यातील ढवळकेवाडी येथील सुरेश राठोड व किरण राठोड या युवकांना आरोग्य खात्यात कनिष्ठ लिपीक पदावर नोकरी लावतो म्हणून १७ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी २३ जून रोजी ५ जणांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपास करुन १२ जुलै रोजी जगदीश शंकरराव कदम (रा.अंबाचौंडी ता.वसमत), १६ जुलै रोजी विनोद श्रीराम राठोड, मनोज साहेबराव पवार, मधुकर पांडुरंग भोकरे यांना अटक केली होती. या चार आरोपींपैकी मधुकर भोकरे याच्याकडून परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर आदी जिल्ह्यातील ५५ सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या नावाने तयार केलेले बनावट नियुक्तीपत्र पोलिसांनी जप्त केले आहेत. आरोग्य विभाग, संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन या विभागाचे संचालक यांची खोटी सही व शिक्के असलेले हे नियुक्ती आदेश बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर तसेच स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, तंत्रज्ञ आदी पदांचे आहेत. त्यामुळे या टोळीची व्याप्ती राज्यभर असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, या फसवणुकीच्या प्रकरणात डॉ.जितेंद्र भोसले (मुंबई) हा मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या गुन्ह्यात आता आरोपींची संख्या ७ झाली आहे. २८ जुलै रोजी अटकेतील चारही आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर रेड्डी, पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
परभणीत फसवणुकीचे प्रकरण :५५ बनावट नियुक्तीपत्रे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:25 AM