परभणी : ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी आता खर्च दाखल करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. मात्र ऑनलाइन खर्च सादरीकरणासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने उमेदवारांनी आता ऑफलाइन खर्च सादरीकरणास पसंती दिल्याचे दिसून येत आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात मुदत संपलेल्या परभणी तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले. या ग्रामपंचयातींमधून निवडून आलेल्या ७३६ उमेदवारांना ३० दिवसांच्या आत निवडणुकीमध्ये झालेला खर्च निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार उमेदवारांनी धावपळ सुरू केली आहे. मात्र निवडणूक विभागाने ट्रू व्होटर मोबाइल ॲपची निर्मिती करून ऑनलाइन खर्च सादर करण्याची संधी दिली. मात्र ऑनलाइन खर्च सादर करताना अनेक अडचणींचा सामना उमेदवारांना करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील निवडून आलेल्या ७३६ उमेदवारांपैकी बहुतांश जणांनी तहसील कार्यालयाकडे ऑफलाइन खर्च सादर करण्यास पसंती दिली आहे.
असा सादर करावा लागतो ऑनलाइन खर्च
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमन १९५८ नुसार उमेदवारांना निवडणुकीचा निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत खर्च करणे बंधनकारक आहे. यासाठी निवडणूक विभागाने ट्रू व्होटर ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीनेच निवडणुकीचा खर्च सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र विविध अडचणींचा सामना करावा लागणारे उमेदवार ऑफलाइन खर्च सादर करण्याकडे वळले आहेत.
खर्च सादर करण्यास मोबाइल रेंजचा अडसर
परभणी तालुक्यात ८८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या. यातील बहुतांश गावांमध्ये आजही मोबाइल टॉवर उपलब्ध नसल्याने उमेदवार व ग्रामस्थांच्या मोबाइलला रेंज मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ट्रू व्होटर ॲप उघडून त्यामध्ये निवडणुकीत केलेला खर्च सादर करण्यासाठी मोबाइल रेंजचा प्रमुख अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे उमेदवारांनी ऑफलाइन खर्च सादर करण्यास पसंती दर्शविली आहे.
उमेदवारांना खर्च सादर करण्यासाठी ट्रू व्होटर ॲप उपलब्ध करून दिले आहे. याच ॲपवर ठरावीक मुदतीत खर्च सादर करावयाचा आहे. तेव्हा उमेदवारांनी मुदतीत या ॲपवर निवडणूक काळात झालेला खर्च सादर करणे बंधनकारक आहे.
- डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी, निवडणूक
ग्रामीण भागात मोबाइलला पुरेशी रेंज मिळत नाही. त्यामुळे निवडणुकीत झालेला खर्च ऑनलाइन पद्धतीने सादर करणे जिकिरीचे ठरत आहे. त्यामुळे हा खर्च लेखी स्वरूपात तथा विहित कालावधीत तहसील कार्यालयात सादर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
- पांडुरंग जुंबडे, उमेदवार