परभणी : महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त रमेश पवार यांनी आज आपल्या पदाचा पदभार घेतला. परभणी शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपाचे आयुक्त राहुल रेखावार यांची एप्रिल महिन्यात पदोन्नतीने बदली झाल्यानंतर परभणी महापालिकेतील आयुक्तपद रिक्त होते. दोन दिवसांपूर्वी नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती परभणी मनपाच्या आयुक्तपदी झाल्याचे आदेश निघाले होते. सोमवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आयुक्त रमेश पवार यांनी पदभार स्वीकारला. यानंतर मनपातील नगरसेवक, अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
नवनियुक्त आयुक्त रमेश पवार यांच्याशी संपर्क साधला तेव्हा परभणी शहरात मुलभूत सुविधा पुरविण्याच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. महापालिकेचे उत्पन्न वाढविणे तसेच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम केले जाईल, असेही ते म्हणाले. नाशिक येथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली होती. त्याच धर्तीवर परभणी शहरामध्ये सीएसआरच्या माध्यमातून वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. लोकसहभाग वाढवून शहरात ठिकठिकाणी झाडे लावण्याचे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. सध्या महापालिकेच्या कारभाराची माहिती घेत असून त्यानंतर शहरवासियांच्या गरजा लक्षात घेऊन कामाची दिशा ठरविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.