लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील मुख्य मार्गावरून काढलेल्या शिवजयंती मिरवणुकीत युवकांनी सादर केलेल्या लोककलांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले़ गोंधळ, हलगी वादनासह पुरातन शस्त्रास्त्रांच्या प्रात्यक्षिकांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले़हत्ती, घोडे, ऊंटांसह ही मिरवणूक काढण्यात आली़ ढोल आणि झांज पथकाबरोबरच या मिरवणुकीत लोककलेचे प्रकारही सादर झाले़ त्यात गोंधळी वेशभूषेत गोंधळ सादर करणारे पथक, वासुदेव पथक, नागरिकांचे आकर्षण ठरले़ संबळ वादनही सादर करण्यात आले़ संबळावर ताल धरत युवकांनी नृत्यही केले़ गुजरी बाजार, गांधी पार्क, अष्टभूजा देवी मंदिर, नारायण चाळ, विसावा कॉर्नर आदी चौकांचौकांमध्ये संबळ वादन करण्यात आले़ त्याच बरोबर या पथकाच्या पाठीमागील बाजुस हलगी वादकांचा जत्थाही लक्ष वेधून घेत होता़वादनाच्या या कला प्रकारांबरोबरच शिवरायांच्या युद्ध कलेतील ढाल, तलवारींचे प्रात्यक्षिक युवतींनी सादर केले़ ठिक ठिकाणी या प्रात्यक्षिकांना नागरिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली़ एकंदर शिवजयंती मिरवणुकीत ग्रामीण, पौराणिक कला प्रकारांबरोबरच सादर केलेल्या वेगवेगळ्या प्रात्यक्षिकांनी रंगत भरली होती.
परभणी येथे मिरवणुकीत युवकांनी केले लोककलांचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:05 AM