सेलू (परभणी ) : तालुक्यातील १९ गावातील सुमारे ११ हजार शेतकऱ्यांचे थकलेले दुष्काळी अनुदान महसूल विभागाला प्राप्त झाले आहे. तीन दिवसात संबंधित शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात अनुदान जमा होणार आहे.
गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर शासनाने कोरडवाहू शेतकऱ्यांना दोन हेक्टरीची मर्यादा ठेवून ६ हजार रुपये तर फळबागासाठी हेक्टरी १८ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तालुक्यातील एकूण ९४ गावातील शेतकऱ्यांना यापूर्वी ३५ कोटी ३३ लाख ५८ हजार रुपयांचे अनुदान दोन टप्प्यात वाटप करण्यात आले होते. पंरतू १९ गावातील ११ हजार शेतकरी या अनुदानापासून वंचित होते.
यंदाच्या खरीप हंगामासाठी बी बियाणे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्याने या गावातील अनेक शेतकरी दुष्काळी अनुदानाच्या प्रतिक्षेत होते. अखेर तीन दिवसांपूर्वी या गावातील शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी महसूल विभागाकडे ५ कोटी २७ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सुमारे अकरा हजार शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
या गावातील शेतकऱ्यांना अनुदान.....
तालुक्यातील दुष्काळी अनुदानापासून वंचित असलेल्या रवळगाव, पी सी सावंगी, सेलू, सेलवाडी, शिराळा ,शिंदे टाकळी, सि. बोरगाव , सिमणगाव, सिगंठाळा, सोन्ना, सोनवटी, तळतुंबा, झोडगाव, वालूर, वाकी, तिडी पिंपळगाव, तांदुळवाडी , वाई, वलंगवाडी या गावातील अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ५ कोटी २७ लाख रुपये अनुदान जमा करण्यात येणार आहे. पुढील तीन दिवसानंतर वाटप करण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.