आरक्षणाच्या सुविधांमुळे प्रवाशांना भुर्दंड
परभणी : दक्षिण मध्य रेल्वे विभागाने अद्यापही अनारक्षित प्रवास सेवा सुरू केली नाही. त्यामुळे प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. राज्यातील सर्व व्यवहार सुरू झाले असताना रेल्वेने मात्र अजूनही सवारी रेल्वे गाड्या सुरु केल्या नाहीत. तसेच विनाआरक्षण प्रवास करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे जवळचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
नवीन वसाहतींमध्ये सुविधांचा अभाव
परभणी : शहरातील नवीन वसाहतींमध्ये नागरी सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते, नाली, वीज या समस्या या भागात निर्माण झाल्या आहेत. मनपाने नव्या वसाहतींमध्ये किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
सुपर मार्केट रस्त्यांवर खड्डे
परभणी : सुपर मार्केट ते मोठा मारुती मंदिर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे वाढले आहेत. विशेष म्हणजे, या मार्गावर कारेगाव रोड भागातील २० ते २५ वसाहतीमधील नागरिक वाहतूक करतात. मात्र खड्ड्यांमुळे हा रस्ता अक्षरशः चाळणी झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.
भाजी विक्रेत्यांनी व्यापला बाजारपेठेतील रस्ता
परभणी : येथील बाजारपेठ भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूने भाजी विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता अपुरा पडत आहे. क्रांती चौक ते गांधी पार्क आणि गांधी पार्क ते गुजरी बाजार या रस्त्यावर ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अपूर्ण
परभणी : रब्बी हंगामातील पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट अद्यापही पूर्ण झालेली नाही. पीक कर्जासाठी शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत असले तरी बँक प्रशासन मात्र कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ करीत आहे. यावर्षी बँकांनी खरीप हंगामातही कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण केले नव्हते. बँकांच्या धोरणाविरुद्ध शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मोंढा बाजारपेठेत रस्त्याची दुरवस्था
परभणी : शहरातील मोंढा बाजारपेठेतील रस्ते खराब झाले आहेत. त्यामुळे या भागातून वाहतूक करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना खड्ड्यांचा अडथळा निर्माण होत आहे. बाजार समिती प्रशासनाने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
सार्वजनिक हातपंप दुरुस्तीची मागणी
परभणी : शहरातील विविध प्रभागांमध्ये पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी हातपंप घेतले होते. यातील बहुतांश हातपंप सध्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महापालिकेने प्रभागांमधील सार्वजनिक हातपंपाची दुरुस्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. विशेष म्हणजे, या हातपंपांना पाणी उपलब्ध आहे. किरकोळ दुरुस्ती केल्यानंतर प्रभागात पाणी उपलब्ध होणार आहे.