परभणी : २०१६-१७ मध्ये सोयाबीनची विक्री केलेल्या शेतक-यांच्या खात्यावर शासनाच्या वतीने दिल्या जाणारे सानुग्रह अनुदान जमा करण्याची प्रक्रिया मानवत बाजार समितीने सुरू केली आहे. बाजार समितीकडे १ हजार ७४७ शेतक-यांसाठी ४८ लाख २६ हजार ६९० रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे.
मानवत तालुक्यात २०१६-१७ या वर्षामध्ये सोयाबीन पिकाचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले होते. तसेच अनेक शेतक-यांनी दुबार पेरणी करूनही चांगले पीक आले नव्हते. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट झाली. शिवाय बाजारपेठेतही कवडीमोल दराने सोयाबीनची विक्री करावी लागली. त्यामुळे शेतक-यांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन राज्य शासनाने आॅक्टोबर ते डिसेंबर २०१६ या कालावधीत सोयाबीनची विक्री केलेल्या शेतक-यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान जाहीर केले होते. बाजार समितीमार्फत त्याचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मानवत तालुक्यातील १ हजार ६४७ शेतक-यांनी सोयाबीन अनुदानासाठी बाजार समितीकडे प्रस्ताव दाखल केले होते.
बाजार समितीने १ हजार ७४७ शेतक-यांसाठी ४८ लाख २६ हजार ६९० रुपये अनुदानाचा अहवाल निबंधक कार्यालयाकडे पाठविला होता. हे अनुदान नुकतेच मंजूर झाले असून आरटीजीएसद्वारे शेतक-यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. बाजार समितीच्या वतीने ६ नोव्हेंबर रोजी शेतक-यांची नावे, खाते क्रमांक आयएफसी कोड, बँकेच्या नावासह यादी लावण्यात येणार आहे. बाजार समितीच्या सूचना फलकावर लावलेली यादी शेतक-यांनी तपासून घ्यावी, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रत्यक्षात रक्कम केव्हा मिळणार ?शासनाच्या वतीने प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सोयाबीनचे अनुदान तालुक्याला जमा झाले आहे. हे अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया बाजार समितीने सुरू केली आहे. रक्कम खात्यावर जमा होणार असली तरी बँकेत होणारी गर्दी लक्षात घेता अनुदान हाती केव्हा पडेल? याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
सोमवारी यादी लागेल पात्र शेतक-यांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे. प्रस्ताव सादर केलेल्या शेतक-यांनी बाजार समितीच्या सूचना फलकावर लावलेल्या यादीतील आपली नावे व इतर माहिती ६ नोव्हेंबर रोजी तपासून घ्यावी.- भाग्यश्री मुंडे, सहायक निबंधक
शेतक-याच्या सोयीसाठी यादी चुकीच्या खात्यात पैसे जमा होऊ नयेत व पुन्हा शेतक-यांना अनुदानासाठी वाट पहावी लागू नये. म्हणून शेतक-यांची यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे.- गंगाधरराव कदम , सभापती, कृऊबा