मानवत : महसूल विभागाने तालुक्यात नव्याने निर्माण केलेल्या ८ तलाठी सज्जाचा कारभार शासनाच्या लाल फितीत अडकला आहे. तलाठी सज्जांची निर्मिती करुन अडीच वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. नवीन पदे मंजूर करण्यात न आल्याने अजूनही जुन्याच तलाठी कार्यालयातून कारभार चालविला जात असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून अडीच वर्षांपूर्वी मानवत तालुक्यातील तलाठी सज्जांची पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेत नव्याने ८ सज्जा बरोबरच २ मंडळांची निर्मिती करण्यात आली. परिणामी सज्जांची संख्या २१ वरुन २९ वर गेली. तर महसूल मंडळाची संख्या ३ होती. नवीन पुनर्रचनेत ही संख्या ५ वर गेली आहे. पूर्वी एकाच तलाठी सज्जावर बहुसंख्य गावांचा ताण पडत असल्याने शेतकऱ्यांची कामे वेळेत होत नव्हती. शिवाय तलाठी सज्जांना जोडण्यात आलेल्या गावाचे अंतरही दूर असल्याने शेतकऱ्यांना अनंत अडचणींसह आर्थिक फटकाही बसत होता. शेतकरी आणि ग्रामीण भागातील ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल विभागाने १ जानेवारी २०१८ ला तालुक्यातील सज्जांची पुनर्रचना करण्यात आली. या मध्ये सोमठाणा, टाकळी नि, देवलगाव अवचार, पिंपळा, किन्होळा, कुंभारी, पोहंडुळ, हाटकरवाडी, या ८ नवीन तलाठी सज्जांची निर्मिती करण्यात आली. नवीन सज्जामुळे अतिरिक्त कामाचा ताण कमी होऊन शेतकऱ्यांसह नागरिकांना तत्काळ सेवा उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र अडीच वर्षाचा कालावधी लोटला तरी शासनाकडून नवीन तलाठी सज्जा व २ नवीन महसूल मंडळासाठी आवश्यक असणारी पदेच मंजूर करण्यात आली नसल्याने तलाठी सज्जे कागदावरच राहिले आहेत.
मानवत शहरातून सज्जांचा कारभार
जे तलाठी तहसील कार्यालयात सध्या कार्यरत आहेत. ते अपडाउन करीत असल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात सद्यस्थितीत मानवत, रत्नापूर, मानोली, उक्कलगाव, पाळोदी, सावळी, रुढी, नागरजवळा, कोल्हा, कोथाळा, इरळद, करंजी, ताडबोरगाव, सावरगाव, केकरजवळा, वझुर बु, सारंगापूर, रामेटाकळी, रामपुरी बु, मंगरुळ बु, भोसा असे एकूण २१ सज्जे आहेत. यापैकी बहुतांश तलाठ्यांनी ऑनलाईन कामे करण्यासाठी सज्जाच्या ठिकाणी नेटवर्कमध्ये अडचणी येत असल्याचे कारण दाखवून शहरात सज्जे थाटले आहेत. ५३ गावे या सज्जाला जोडलेली असून हजारो ग्रामस्थांना दाखले किंवा प्रमाणपत्रासाठी शहरात यावे लागत आहे. यामुळे आर्थिक फटका बसत असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.