लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोनाच्या संकटामुळे दहा दिवस अतिशय संयमाने आणि शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी जोरदार तयारी केली आहे. महापालिकेने विसर्जनासाठी मोठा हौद उभारला असून, गणेशमूर्ती संकलनासाठी ३५ वाहने सज्ज ठेवली आहेत.
कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी सार्वजनिक गणेश मंडळांना यावर्षीही परवानगी दिली नव्हती. त्यामुळे गणेशभक्तांनी साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला. गणेशोत्सव काळात कुठेही गर्दी झाली नाही. दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. त्यामुळे बाप्पांना निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी जोरदार तयारी केली आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन पर्यावरणपूरक व्हावे, या उद्देशाने महानगरपालिकेने वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात मोठा हौद उभारला आहे. याठिकाणी सार्वजनिक तसेच घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत. तसेच मुख्य रस्त्यापासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पक्का रस्ताही तयार करण्यात आला आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे ३० ते ३५ कर्मचारी गणेशभक्तांच्या सेवेसाठी याठिकाणी नियुक्त केले आहेत. शहरातील विविध भागांमधून गणेशमूर्तींचे संकलन करण्यासाठी ३५ वाहने सज्ज ठेवण्यात आली असून, ही वाहने फुलांनी सजविण्यात आली आहेत. ही वाहने प्रत्येक वसाहतीमध्ये जाणार असून, नागरिकांच्या घरातून गणेशमूर्ती संकलित करणार आहेत.
बैठकीत मनपाने केले नियोजन
श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी महापालिकेच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी आयुक्त देविदास पवार यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. या बैठकीला सहाय्यक आयुक्त शिवाजी सरनाईक, अल्केश देशमुख, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, मेराज अहमद, विकास रत्नपारखी, श्रीकांत कुरा, लक्ष्मण जोगदंड, शेख शादाब, पाणी पुरवठा विभागाचे शेख इस्माईल, राजकुमार जाधव आदी उपस्थित होते.
अनिता सोनकांबळे यांनी केली पाहणी
महापौर अनिता सोनकांबळे यांच्यासह उपमहापौर भगवान वाघमारे, आयुक्त देविदास पवार यांनी जलशुद्धीकरण केंद्र परिसरात उभारलेल्या हौदाची पाहणी केली. याठिकाणी केलेल्या व्यवस्थेची पाहणी करत कर्मचाऱ्यांना काही सूचनाही केल्या. नागरिकांनी स्वतःहून इतर कुठेही गणेशमूर्तीचे विसर्जन करू नये, गणेशमूर्ती संकलित करण्यासाठी महापालिकेने वाहनाची व्यवस्था केली असून, मनपा कर्मचाऱ्यांकडे गणेशमूर्ती सुपूर्द करावी, असे आवाहन महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे व आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.