परभणी : जुनेगाव खळी (ता. गंगाखेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारत बांधकामाबाबत खोट्या तक्रारींच्या आधारे दिलेली स्थगिती तत्काळ उठवावी, अन्यथा विद्यार्थ्यांना शेळ्या द्या अशी मागणी करत गुरूवारी (दि.८) दुपारी जिल्हा परिषद कार्यालयात ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसह ठिय्या आंदोलन केले. शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना जागा उपलब्ध नसल्याने उघड्यावर बसून ज्ञानार्जन करावा लागत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात शाळेचे बांधकाम सुरू आहे. परंतु, याबाबत तक्रारी पुढे आल्यानंतर कामास स्थगिती देण्यात आली आहे. संबंधित स्थगिती उठवावी, या मागणीसाठी ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेत आंदोलन केले. याबाबत ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट घेतल्यानंतर थोडा वेळ द्या, असे प्रशासनाने म्हणणे आहे. त्यामुळे जबाबदार यंत्रणेने विद्यार्थ्यांचे विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.