सेलू : जागतिक वारसा दिनानिमित्त टपाल खात्याने परभणी जिल्ह्यातील वालूर येथील सुप्रसिद्ध ''हेलिकल स्टेपवेल व नगर जिल्ह्यातील हत्तीबारवची छबी पोस्टकार्ड व आंतर्देशीय पत्रावर झळकत आहेत. टपाल खात्याकडून प्राचिन बारव स्थापत्याचे अंकन होण्याचा बहुमान प्रथम मिळतोय हे विशेष.
''वर्ड हेरिटेज डे '' निमित्त मुंबई पोस्टल विभागाने १८ एप्रिल २०२३ रोजी परभणी जिल्ह्यातील वालूर येथील कुंडलाकार (हेलीकल स्टेपवेल)बारव व नगर जिल्ह्यातील हत्ती बारवच्या छायाचित्रांचे तिकिट प्रकाशित केले आहे. वालूर येथील बारवेचा लाईन डायग्राम छत्रपती संभाजीनगर पुरातत्व विभागाचे समन्वयक मयुरेश खडके तर हत्तीबारवेचे वेदिका शितरे यांनी तयार केलेला आहे. महाराष्ट्र बारवा मोहिमेचे समन्वयक रोहन काळे यांनी या कामी पाठपुरावा केला. सेलू तालुक्यातील वालूर येथील ग्रामस्थांनी गतवर्षी एकत्रितपणे श्रमदानातून वरील बारव पुनर्जिवीत केलेली आहे. कुंडलाकार आकाराच्या या बारवेचे स्थापत्य आगळे वेगळे असल्यामुळे गेली वर्षभर ती चर्चेत आहे.