प्रभू जाधव यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
परभणी : येथील सावता परिषदेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी शहरातील खानापूर नगर येथील प्रभू जाधव यांची १२जानेवारी रोजी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे यांनी जाधव यांना नियुक्तिपत्र दिले आहे.
धान्य कोटा मंजूर करण्याची मागणी
परभणी : शहरातील नागरिकांना तहसील कार्यालयाकडून नवीन केसरी शिधापत्रिका व विधवा स्त्रियांना पिवळ्या शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत. मात्र त्यांच्यासाठी नवीन धान्य कोटा मंजूर करण्यात आलेला नाही. त्यामुळे पुरवठा विभागाने तत्काळ केसरी नवीन शिधापत्रिकाधारकास धान्य कोटा मंजूर करावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर परमेश्वर जोंधळे यांची स्वाक्षरी आहे.
लोकश्रेय मित्रमंडळाचे आयुक्तांना निवेदन
परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक ११मधील काजीबाग येथे नालीचा ढापा दबल्यामुळे नळाचे पाणी चक्क रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर पाण्याचा डोह साचत आहे. परिणामी या परिसरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नाल्यांची सफाई करून रस्त्यावरील पाणी बंद करावे, अशी मागणी लोकश्रेय मित्रमंडळाच्या वतीने १४ जानेवारी रोजी एका निवेदनाद्वारे मनपा आयुक्त देवीदास पवार यांच्याकडे केली आहे.
बसस्थानकात चोरीच्या घटना सुरूच
परभणी : येथील बसस्थानकात मागील महिनाभरासून चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कधी महिला तर कधी ज्येष्ठ नागरिकांच्या खिशातून पैसे लांबविल्याचे प्रकार घडत आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
जिल्हा रुग्णालयाला वाहनांचा गराडा
परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांचा सर्रास वावर वाढला आहे. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर रुग्णवाहिकाही रस्त्यातच लागत असल्याने गैरसोय वाढली आहे.
जिंतूर-परभणी रस्त्यावर अपघात वाढले
परभणी : परभणी-जिंतूर या महामार्गाचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. जागोजागी खोदकाम केल्याने रात्री-अपरात्री भरधाव वेगाने येणाऱ्या परजिल्ह्यातील वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. मात्र त्याकडे सार्वजिनक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
साडेतीन हजार प्रस्ताव केले रद्द
परभणी : शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात दहा हजार २४ शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव दाखल केले. त्यातील महावितरण कंपनीच्या वतीने ५ हजार १५४ प्रस्ताव मंजूर करून ३ हजार २६३ प्रस्ताव रद्द केले आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळत नसलेल्या शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.