सोनपेठ (परभणी ) : मुले पळविणारा असल्याचा संशय घेऊन नागरिकांनी एका मनोरुग्णास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना आज सकाळी तालुक्यातील हनुमाननगर तांडा येथे घडली.
मुले पळविणारी टोळी कार्यरत झाल्याची अफवा सध्या तालुक्यात पसरली आहे. त्यामुळे नागरिक अधिकच संवेदनशील झाले असून शाळा, वसाहतीमधील मोकळ्या मैदानात अनोळखी व्यक्ती दिसल्यानंतर संशय बळावत आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एक व्यक्ती शेळगाव येथून सोनपेठकडे पायी येत असताना वाटेत हनुमाननगर तांड्यासमोरुन जात होता. या व्यक्तीविषयी नागरिकाला संशय आला. नागरिकांनी त्याला लगेच ताब्यात घेतले आणि सोनपेठ पोलीस ठाण्यात आणले.
पोलिसांनी चौकशी केली तेव्हा हा व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. सुरेश बापुराव बोरगावकर (रा.धारुर ह.मु.शेळगाव) असे या मनोरुग्णाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेळगाव ही त्याची सासरवाडी असून सोनपेठ येथे त्याची बहीण राहत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यास सोडून देण्यात आले.