लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत किरकोळ केरोसीन आणि रास्तभाव दुकानांचे ४१ परवाने नव्याने दिले जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे़ ७ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मुलाखती घेऊन नवीन परवाना धारकांची निवड करण्यात येईल़परभणी जिल्ह्यामध्ये १ हजार ४९१ किरकोळ केरोसीन परवानाधारक आणि १ हजार १८७ रास्तभाव परवानाधारक आहेत़ या परवानाधारकांमार्फत रास्तभाव दराने अन्नधान्य आणि केरोसीनचे वितरण केले जाते़ सार्वजनिक वितरण प्रणालीत काम करीत असताना त्यात अनियमितता आल्याने जिल्हा पुरवठा अधिकाºयांमार्फत परवानाधारकांवर कारवाई केली जाते़अनेक वेळा सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्याचा गैरव्यवहार झाल्याची प्रकरणेही समोर आली आहेत़ अशा प्रकरणात चौकशी समितीकडून परवानाधारकांची चौकशी केली जाते़ चौकशीत दोषी आढळल्यानंतर परवानाधारकास निलंबित करणे, परवाना रद्द करणे अशी कारवाई केली जाते़ या कारवाईमध्ये परवाना निलंबित झाला असेल तर सदर परवानाधारकास कालांतराने परवान्याचे नूतनीकरण करून काम करण्याची संधी मिळते़ मात्र परवाना रद्द झाला असेल तर त्या जागी नवीन परवानाधारकाची निवड करण्याची तरतूद आहे़ शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात रद्द झालेल्या आणि राजीनामे दिलेल्या परवानाधारकांच्या जागी नवीन परवाने देण्याचे सूचित केले होते़ मागील वर्षभरात जिल्ह्यातील ४१ परवाने रिक्त होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा विभागाने १४ आॅगस्ट २०१७ रोजी जिल्ह्यातील पात्र संस्थांकडून अर्ज मागविले होते़ हे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले असून, ७ डिसेंबर रोजी नवीन परवानाधारकांची निवड केली जाणार आहे़ मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कक्षात अर्जदारांनी मोठी गर्दी केली होती़ या सर्वांचे अर्ज दाखल करून घेण्यात आले आहेत़ आता गुरुवारी सकाळच्या सत्रात केरोसीन आणि दुपारच्या सत्रात रेशन परवान्यासाठी मुलाखती होणार आहेत़
सार्वजनिक वितरण प्रणाली : परभणीत गुुरुवारी अर्जदारांच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:15 AM