परभणी : येथील एका पतसंस्थेला दिेलेल्या धनादेशाच्या अनादर केल्या प्रकरणी एका व्यक्तीस १ लाख ६५ हजार रुपयांचा दंड व कोर्ट उठेपर्यतची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे वसुली अधिकारी भास्कर जोशी यांनी संतोष कचरु नालमे (रा. नांदखेडा) यांच्याविरुद्ध धनादेशाचा अनादर केल्याची फिर्याद दाखल केली होती. पतसंस्थेकडून त्याने १ लाख रुपये कर्ज घेतले. कर्जाची रक्कम भरली नसल्याने ४ ऑक्टोबर २०१७ रोजी व्याजासह त्यांना १ लाख ५५ हजार ३५६रुपयांची मागणी केली असता त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा स्वत:चा धनादेश दिला; परंतु, तो वटला नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला. या प्रकरणी न्यायाधीश व्ही.एन. पंडित-ढवळे यांच्या न्यायालयात ९मार्च रोजी सुनावणी झाली. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने आरोपीस संतोष नालमे यांना दोषी ठरवून कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व १लाख ६५ हजार रुपयांचा दंड तसेच आरोपींनी दंड भरलेल्या रक्कमेपैकी फिर्यादी पतसंस्थेस १लाख ५५ हजार आणि नुकसान भरपाईचे ५ हजार रुपये देण्याचे आदेशित केले. या प्रकरणी फिर्यादीच्या वतीने ॲड. आनंद गिराम यांनी बाजू मांडली. यासाठी संस्थेचे अध्यक्ष अनिल अष्टुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधिकारी भास्कर जोशी यांनी साक्षीपुरावा दिला असल्याची माहिती ॲड. गिराम यांनी दिली.