सेलू तालुक्यात सर्वाधिक कापासाचे क्षेत्र असून या उत्पादनावर शेतकऱ्यांची आर्थिक मदार आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील कापूस, सोयाबीन आणि तूर आदी पिकांचे नुकसान झाले होते. किरकोळ बाजारात कापसाची कवडीमोल भावाने खरेदी केली होती. परिणामी उत्पादन खर्चदेखील निघत नव्हता. १९ नोव्हेंबरपासून सीसीआयकडून शहरासह वालूर आणि देवगाव फाटा येथे एकूण ११ जिनिंगवर कापूस खरेदी सुरू आहे. बाजार समितीने ही नियोजन लावून शेतकऱ्यांच्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न केला. परजिल्हातून कापूस विक्रीसाठी शेतकरी येत आहेत. त्यामुळेच पुन्हा एकदा सेलू येथे विक्रमी कापूस खरेदी होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सीसीआयच्या वतीने २ महिन्यांत ५ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.
आजपासून कापूस खरेदी सुरू
तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. शनिवार, रविवार अशा सलग तीन सुट्ट्या आल्याने सीसीआयची कापूस खरेदी बंद होती. सोमवारपासून कापूस खरेदी पुर्ववत होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव प्रकाश पौळ यांनी दिली आहे.
यार्डात २०० वाहने
बाजार समितीचा कापूस यार्ड परिसरात २०० वाहने उभी असून सोमवारपर्यंत आणखी वाहने दाखल होण्याची शक्यता आहे. सलग सुट्ट्या आल्याने कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना वाहन खर्चाचा अधिकचा भुर्दंड सोसावा लागत आहे. गतवर्षी सीसीआयकडून जून महिन्यापर्यंत कापूस खरेदी केली जात होती. त्यामुळे गतवर्षी ७ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली होती. यंदाही विक्रमी कापूस खरेदी होण्याची शक्यता आहे.