गतवर्षी कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वच व्यवहार ठप्प पडले होते. कापूस खरेदी बंद पडल्याने याचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ही बसला गेला होता ,
मात्र, शासनाने यावर तोडगा काढत महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या शासकीय कापूस खरेदीसाठी ऑनलाईन कापूस नोंदणी प्रक्रिया राबविली. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा यादीप्रमाणे आपला कापूस मार्केट यार्डात आणून वेळेत विक्री करणे शक्य झाले होते.
राज्य शासनाने यावर्षी पणन महासंघाच्या शासकीय कापूस खरेदीसाठी बाजार समितीमार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन कापूस नोंदणी प्रक्रिया राबवली. ३ डिसेंबरपासून तालुक्यात कापूस खरेदीस सुरुवात करण्यात आली. ऑनलाईन नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीमार्फत मोबाईलवर मेसेज पाठवून कापूस खरेदीसाठी घेऊन येण्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत ८ हजार ६०५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. पणन महासंघाच्यावतीने ३४ दिवसांत १९५० शेतकऱ्यांचा ५४ हजार ५५० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.