यावर्षीच्या खरीप हंगामात जिंतूर तालुक्यात २८ हजार ५०० हेक्टरवर कापसाची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला. परिणामी उत्पादनात मोठी घट झाली आहे. नैसर्गिक संकटातून बचावलेले कापूस पीक सध्या बाजारात विक्रीसाठी येत आहे. मात्र, खाजगी बाजारपेठेत केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा प्रतिक्विंटल अकराशे रुपयांनी हा कापूस कमी दरात घेतला जात असल्याने शेतकरी सीसीआयच्या खरेदी केंद्राकडे वळले आहेत. २३ नोव्हेंबरपासून सीसीआयच्या वतीने जिंतूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. प्रतिक्विंटल ५ हजार ७२५ रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. २३ नोव्हेंबर ते ४ जानेवारी या दोन महिन्यांच्या कालावधीत सीसीआयच्या वतीने १ लाख २५ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दररोज तीनशे वाहनांतून येणाऱ्या जवळपास सहा हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात येत आहे. त्याचबरोबर कापूस खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना वेळेत पैसे देण्यातही सीसीआय पुढे दिसत आहे. आतापर्यंत ४ हजार ६४३ शेतकऱ्यांना ६८ कोटी ४२ लाख रुपयांचे वाटप केले आहे.
बाजार समितीचेही योगदान
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मागील दोन महिन्यांपासून कापूस खरेदी सुरू आहे. या कापूस खरेदीला कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी सभापती मनोज थिटे, सचिव एस. बी. काळे, सहसचिव गणेश हारगावकर, ग्रेडर गायकवाड, निरीक्षक पी. एल. लिखे, पर्यवेक्षक सरकटे, सीसीआयचे ग्रेडर रामा अवतार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीने कापूस घेऊन आलेल्या वाहनांसाठी योग्य नियोजन केले आहे. त्यामुळे सुरळीत कापूस खरेदी सुरू आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
अतिवृष्टीचा फटका, कापूस वेचण्यासाठी मजुरांचे वाढलेले दर व मिळत असलेला कमी भाव या तिहेरी संकटामुळे शेतकऱ्याला आर्थिक गणित जुळवणे अवघड झाले होते. मात्र, सीसीआय हमी दराने कापूस खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.