मानवत : येथील शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर गेल्या १५ दिवसांत १ हजार ६१ क्विंटल हरभऱ्याची हमीदराने खरेदी करण्यात आली आहे. मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. सद्यस्थितीत खुल्या बाजारात हरभऱ्याला ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून, शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मात्र ५ हजार १०० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हरभरा विक्रीसाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्राला प्राधान्य देत आहेत. १५ फेब्रुवारीपासून खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात शेतकऱ्यांची हरभरा विक्रीच्या दृष्टिकोनातून ऑनलाईन नोंदणी सुरू झाली. २० मार्चपर्यंत तब्बल २ हजार ७० शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी १ हजार २५० शेतकऱ्यांची प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित शेतकऱ्यांची प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना हरभरा विक्रीसाठी केंद्रावर आणण्याकरिता एसएमएस पाठविण्यात येत आहेत. १९ मार्चपर्यंत ६०० शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी १०६ हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या १५ दिवसांत १ हजार ६१ क्विंटल हरभरा येथील केंद्रावर आणून विकला आहे. दुसरीकडे ऑनलाईन नोंदणीसाठी सात-बारा, बँक पासबुक, आधारकर्ड, पीक पेरा आदी कागदपत्रांची आवश्यकता असल्याने व पैशांसाठीही विलंब लागत असल्याने काही शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांकडे हरभऱ्याची विक्री केली आहे. मानवतच्य बाजारात ५ हजार क्विंटल हरभरा खासगी व्यापाऱ्यांनी खरेदी केला आहे. विशेष म्हणजे खासगी व्यापाऱ्यांचा दर हमीभावापेक्षा कमी असतानाही शेतकऱ्यांचा कल या व्यापाऱ्यांकडेच दिसून येत आहे.
सोयाबीनची खरेदी शून्यावर
मागील आठवड्यात बाजार समितीच्या यार्डात सोयाबीनची आवक वाढल्याचे पाहावयास मिळाले. या आठवड्यात मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. हमीभाव केंद्रावर १५ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यामध्ये फक्त १६३ शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली. त्यापैकी ५३ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. मात्र एकाही शेतकऱ्याने आपला माल विक्रीसाठी हमीभाव खरेदी केंद्रावर आणला नाही. दुसरीकडे खासगी व्यापाऱ्यांना मात्र तब्बल ५० हजार क्विंटल सोयाबीनची विक्री करण्यात आली आहे. परिणामी हमीभाव खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या सोयाबीनची प्रतीक्षा लागली आहे.