गंगाखेड (परभणी ): शासकीय हमी भावात खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने गंगाखेड येथील हमीभाव खरेदी केंद्रावरील तूर खरेदी मंदावली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे गंगाखेड, पालम, सोनपेठ या तीन तालुक्यातील तूर उत्पादक अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे.
गंगाखेड, पालम, सोनपेठ या तीन तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग कार्यालयाने गंगाखेड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या वखार महामंडळाच्या शासकीय गोडाऊनसमोरील खाजगी गोडाऊन भाडेतत्वावर घेऊन तेथे शासकीय हमीभावात तूर खरेदी केंद्र सुरू केले आहे. हे केंद्र १५ फेब्रुवारीपासून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालासाहेब निरस, सचिव माणिकराव नरवाडे, लक्ष्मण भोसले, सहाय्यक निबंधक प्रकाश राठोड यांच्या उपस्थितीत सुरू झाले.
तूर विक्रीसाठी खरेदी विक्री संघात आॅनलाईन नोंदणी करणाऱ्या तीन तालुक्यातील ३ हजार ५०० तूर उत्पादक शेतकऱ्यांपैकी २३ मार्चपर्यंत केवळ ३०३ शेतकऱ्यांचीच ४ हजार ५५४ क्विंटल ५० किलोची खरेदी करण्यात आली. तूर खरेदीसाठी भाडेतत्वावर खाजगी गोडाऊनमध्ये जागा कमी असल्याने येथे खरेदी केलेली १ हजार ६७५ क्विंटल तूर वखार महामंडळाच्या शासकीय गोडाऊनमध्ये हलविण्यात आली. तरीही जागा नसल्याने २७ मार्च रोजी या गोडाऊनमधील तूर वाहनाद्वारे जिंतूर तालुक्यातील बोरी येथील गोडाऊनमध्ये हलवून खुल्या झालेल्या जागेवर तूर खरेदी काटा सुरू करण्यात आला आहे. शिल्लक जागेनुसार आॅनलाईन नोंदणी केलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना बोलावून एका काट्यावर मोजमाप करून तूर खरेदी केली जात असल्याने या खरेदी केंद्रावरील गती मंदावली आहे. सुरुवातीलच जागेअभावी १ फेब्रुवारी एैैवजी १५ फेब्रुवारी रोजी म्हणजेच पंधरा दिवस उशिराने सुरू झालेल्या या तूर खरेदी केंद्रावर संथ गतीने तूर खरेदी करण्यात आली. या केंद्रावर आॅनलाईन नोंदणी केलेल्या संपूर्ण तूर उत्पादकांची १८ एप्रिलपर्यंत खरेदी होईल का? असा प्रश्न शेतकरी बांधवातून केला जात आहे. तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करून त्याची साठवण करण्यासाठी जादा क्षमतेचे गोडाऊन उपलब्ध करून एका पेक्षा अधिक वजन काटे सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.
दोन शेतकऱ्यांची तूर केली परतगंगाखेड येथील हमीभाव खरेदी केंद्रावर २७ मार्च रोजी एसएमएस पाठवून तूर खरेदीसाठी बोलावलेल्या १२ तूर उत्पादक शेतकऱ्यांपैकी १० शेतकऱ्यांची ९८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. मात्र त्यातील दोन शेतकऱ्यांची तूर खराब असल्याचे कारण देत परत करण्यात आली. त्यामुळे तूर उत्पादक अडचणीत सापडले आहेत. गावातून हमीभाव खरेदी केंद्रावर माल आणण्यासाठी शेतकऱ्यांना वाहन भाडे द्यावे लागते. त्यातच केंद्र प्रशासनाने तूर खराब असल्याचे कारण देत शेतमाल परत केलेल्या या परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागली.
मोठ्या क्षमतेचे गोडाऊन हवे गंगाखेड, पालम व सोनपेठ तालुक्यातील साडेतीन हजारांपेक्षा अधिक तूर उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकण्यासाठी खरेदी विक्री संघाच्या कार्यालयात ऑनलाईन नोंदणी केली आहे. आतापर्यंत ३४७ शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली आहे. तसेच जिल्हा मार्केटिंग अधिकारी व गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीने मोठ्या क्षमतेचा गोडाऊन उपलब्ध करून दिल्यास ४ काटे सुरू करून तूर खरेदी केली जाईल. - लक्ष्मणराव भोसले, व्यवस्थापक ख.वि. संघ