परभणी : पूर्णा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे २२ टक्के नमुने दूषित आढळले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या गावांमध्ये साथरोग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील पाणी नमुन्यांचे तपासून केली जाते.
जिल्हा प्रयोगशाळेच्या मुख्य अनुजीव शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली आहे. या तपासणीमध्ये जिल्ह्यात १०.६७ टक्के पाण्याचे नमुने दूषित असल्याचा अहवाल दिला आहे. पूर्णा तालुक्यात सर्वाधिक २२ टक्के नमुने दूषित आढळले आहे. तर परभणी तालुक्यात १२ टक्के, गंगाखेड १२, सोनपेठ १४, मानवत ७, जिंतूर ७ आणि पाथरी तालुक्यात १३ टक्के नमुने दूषित आढळले आहेत. विशेष म्हणजे, सोनपेठ आणि सेलू या दोन तालुक्यांमध्ये एकही पाणी नमुना दूषित आढळला नाही. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलस्त्रोतांच्या पाण्याची ही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दूषित नमुने आढळलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतींनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यामध्ये टायफाईड, कॉलरा, कावीळ, मलेरिया असे साथीचे आजार दूषित पाण्यामुळे होऊ शकतात.
जलशुद्धीकरण यावर भर द्या टाकसाळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी ग्रामपंचायतींच्या पाणी नमुन्यांचा नुकताच आढावा घेतला. दूषित पाणी नमुने असलेल्या ग्रामपंचायतींनी पाणी शुद्ध करण्यासाठी काळजी घ्यावी, दहा टक्के पेक्षा अधिक पाणी नमुने दूषित असलेल्या ग्रामपंचायतींनी टीसीएल पावडरचा वापर करावा व पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत.