परभणी : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालात मतदारांनी नवनेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक दिग्गजांना धक्के देत कात्रजचा घाट दाखविला. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकालाची नोंद झाली असून, ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
जिल्ह्यातील नऊही तालुक्यांच्या ठिकाणी सोमवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. मतदारांची व उमेदवारांची संख्या मर्यादित असल्याने हळूहळू निकालाचे चित्र स्पष्ट होत गेले. जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. येथे भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर, माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी तळ ठाेकूनही जि.प. उपाध्यक्ष अजय चौधरी यांच्या पॅनलने १७ पैकी १२ जागा जिंकत बोर्डीकरांना धक्का दिला. चार ठाण्यात माजी आ. विजय भांबळे यांच्यापासून दुरावलेले राष्ट्रवादीचे नेते नानासाहेब राऊत यांच्या पॅनलला बहुमत मिळण्यास अपयश आले. येथे राऊत यांच्या पॅनलला सात, तर भाजपच्या पॅनललाही सातच जागा मिळाल्या. काँग्रेसच्या पॅनलला दोन, तर शिवसेनेला एक जागा मिळाली. सत्तेची चावी काँग्रेसकडे आली आहे. जिंतूर पं.स. सभापती वंदना इलग, उपसभापती शरद मस्के या राष्ट्रवादीच्या दोन्ही पदाधिकाऱ्यांना त्यांच्या गावात सत्ता राखता आली नाही. जि.प.च्या माजी अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या पॅनलने पिंपळगाव काजळे तांडा ग्रा.पं.त निसटता विजय मिळविला. पांगरी ग्रा.पं.त माजी अध्यक्षा मीनाताई बुधवंत यांनी मात्र सत्ता राखली. माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या ग्रा.पं.मध्ये ४० वर्षांत पहिल्यांदाच निवडणूक झाली. यात त्यांनी ९ पैकी ६ जागा जिंकल्या असल्या तरी ३ जागा जिंकून विरोधकांनी ग्रा.पं.त प्रवेश केला आहे. शेळगाव ग्रा.पं. राष्ट्रवादीकडेच राहिली आहे. पालममध्ये भाई लक्ष्मणराव गोळेगावकर व राष्ट्रवादीच्या संयुक्त पॅनलने आरखेड ग्रा.पं.त सत्ता मिळविली. जि.प. सदस्या करुणा कुंडगीर यांच्या बोथी गावात त्यांच्या पॅनलचा दारून पराभव झाला. पूर्णा तालुक्यातील चुडावा ग्रामपंचायतीत भाजपचे नेते बालाजी देसाई यांच्या पॅनलला एकही जागा मिळविता आली नाही. जिल्हा बँकेचे अध्यक्ष पंडितराव चोखट, पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांनी त्यांच्या ग्रामपंचायती कायम राखल्या. परभणी तालुक्यातील झरी ग्रामपंचायतीत शिवसेनेने १७ पैकी १० जागांवर विजय मिळविला. येथे कांतराव देशमुख यांचे पॅनल निवडणूक रिंगणात नव्हते.
खासदार जाधव व मुंडे यांच्या सभा घेऊनही पराभवच
शिवसेनेचे खासदार बंडू जाधव यांनी पाथरी तालुक्यातील हादगाव बु., डोंगरगाव, बाणेगाव आणि कानसूर या चार ग्रामपंचायतमध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. या चारही ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रचारसभा येथे फलदायी ठरली नाही. जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी ग्रामपंचायतीत भाजप समर्थक पॅनलच्या प्रचारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची सभा झाली होती. येथेही राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. त्यामुळे त्यांची सभाही येथे फलदायी ठरली नाही.