देवगाव फाटा : निम्न दुधना प्रकल्पाचा जालना जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसाने चार वर्षानंतर प्रथमच १०० टक्के पाणी साठा या धारणात झाला आहे. मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षाने डावा व उजव्या कालवा व चाऱ्याचे काम अर्धवट राहिल्याने प्रस्ताव ३४ हजार हेक्टर सिंचन क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सर्वपक्षीय संघटनांच्या लढ्यानंतर ३० मे १९७९ मध्ये शासनाने निम्न दुधना प्रकल्पास मंजुरी दिली. मात्र हा प्रकल्प निधी तरतुदींच्या अडथळ्यात तीन दशके गुंतला गेला होता. २००८ मध्ये सुधारित आर्थिक तरतुदीनंतर अडथळ्यांची शर्यत संपली आणि तिसऱ्या दशकात हा प्रकल्प पूर्णत्वास गेला होता. २०१० मध्ये थळ भरणी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने या धरणात पाणी साठवण होऊ लागली. प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र हे ४ हजार ६५ चौरस किमीचे आहे. येथून डावा व उजवा कालवा काढण्यात आला. या अंतर्गत सेलू, जिंतूर, मानवत व परभणी तालुक्यातील ३४ हजार हेक्टर सिंचनासाठी प्रस्तावित केले होते. २८ एप्रिल २०१६ रोजी हे निम्न दुधना धरण पहिल्यांदा पूर्ण भरले होते. त्यावेळी ४२.५५ दलघमी अतिरिक्त पाणी दुधना नदीपात्रात सोडले होते. त्यानंतर अतिरिक्त पाणी धरणात सोडण्याची वेळ आली नव्हती. बहुतांश वेळा हे धरण मृतसाठ्यातच राहिले. सप्टेंबर २०२० मध्ये या धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने २०१६ नंतर दुसऱ्यांदा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले. पंतप्रधान सिंचाई योजनेंतर्गत प्रकल्पाचे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी २०१८-१९ मध्ये २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. त्यानंतर २०१७-१८ मध्ये २७ कोटी २८ लाख असा एकूण ५२ कोटी २८ लाखांच्या निधीतून या धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या कामावर १७ कोटी ३९ लाख रुपये खर्च केले गेले. परंतु, त्यानंतर हे काम अर्धवट राहिले गेले. ते प्रशासन आणि ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे कालव्याचे पाणी शेवटपर्यंत जाईल की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे ३४ हजार हेक्टरवरील सिंचनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तुटफूट वाढली
विशेष म्हणजे डाव्या आणि उजव्या कालव्याचे काम करताना सिमेंट आणि वाळूचा वापर कमी झाल्याने ठिक ठिकाणी फरशा निखळल्या आहेत. काही भाग खचला आहे. सद्यस्थितीत या कालव्यात झाडेझुडपे काढण्याचा प्रयत्न केला असला तरी गेटच्या लोखंडी दारांची तुटफूट झाली आहे. प्रशासनाने डाव्या व उजव्या कालव्याच्या कामासह चाऱ्याचे काम पूर्ण केल्यानंतर या भागातील शेती सुजलाम् सुफलाम् होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.